क्रिकेट इतिहासात सचिन तेंडुलकरने केले 'हे' १० विक्रम

सचिन तेंडुलकरने शारदाश्रम विद्यामंदिर शाळेकडून खेळताना विनोद कांबळीसोबत विक्रमी ६६४ धावांची भागीदारी केली.

रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

वयाच्या १५व्या वर्षी सचिन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. त्याने नाबाद १०० धावा केल्या. त्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरला होता.

सचिन तेंडुलकरने २० वर्षांचा होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतके झळकावली, हा एक अनोखा विक्रम आहे.

आयपीएल २०१० मध्ये सचिन तेंडुलकरने ऑरेंज कॅप जिंकली होती. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा सचिन तेंडुलकर पहिला भारतीय ठरला होता. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना १५ सामन्यांमध्ये एकूण ६१८ धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने एकूण २६४ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने १४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तर कसोटीत ११९ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. ज्यात कसोटीत १५ हजार ९२१ धावा आणि एकदिवसीय सामन्यात १८ हजार ४२६ धावा आहेत.

सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेटर आहे. त्याने सर्वाधिक ६६४ सामने खेळले आहेत. ज्यात २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकरला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वेळा मालिकावीर आणि ६२ वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सचिन हा पहिला क्रिकेटर आहे. त्याने २०१० मध्ये ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी केली होती.