पक्ष्यांप्रती जागरुकता वाढवूया... चिमण्यांचे अधिवास  वाचवूया !

चिमण्यांच्या संवर्धानाकरिता दरवर्षी २० मार्चला 'जागतिक चिमणी दिन' जगभरात साजरा केला जातो.

पहिला जागतिक चिमणी दिवस २०१० ला साजरा करण्यात आला होता. ही संकल्पना सर्वप्रथम नेचर फॉरएव्हर सोसायटी (NFS) आणि फ्रान्समधील इको-सिस अॅक्शन फाउंडेशन यांनी मांडली होती.

शहरातील वाढते सिमेंटचे बांधकाम, अवैध वृक्षतोड यामुळे  चिऊताईंची संख्या घटली आहे. प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणीतला अविभाज्य घटक असलेल्या चिमण्यांचं संवर्धन व्हावं याकरिता पक्षीतज्ज्ञ, विविध संस्थांद्वारे चिमण्यांच्या वाढीसाठी कार्य केले जाते.

इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN)ने चिमणीची आपल्या लाल यादीत (Red List) लुप्तप्राय प्रजाती म्हणून नोंद केली आहे. विशेष म्हणजे, काही शहरी भागांत चिमण्यांची संख्या फक्त ९९ टक्के इतकीच राहिली आहे.

चिमणी संवर्धनासाठी जगभरात जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. 'एक मूठ धान्य- एक ओंजळ पाणी' हे अभियान राबवण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी आणि जैवविविधता संवर्धन समुहाच्यावतीने करण्यात आले आहे.

चिमण्यांचे रक्षण आणि संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाअंतर्गत अल्पदरामध्ये शेकडो कृत्रिम घरटी आणि बर्ड फिडर पुरवले जातात. निसर्गप्रेमी नागरिक हे बर्ड फिडर आपल्या अंगणात, बागेत किंवा परिसरात लावून चिमणी संवर्धनास हातभार लावतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेचा दाह मनुष्याप्रमाणे पक्ष्यांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे या दिवसांत त्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याची सोय ग्रिलमध्ये, घराच्या अंगणात पाण्याची व्यवस्था करावी किंवा एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे.

या पक्ष्यांसाठी कमीत कमी १० फूट उंचीवर लाकडाचे कृत्रिम घरटे तयार करावे.

पक्ष्यांचे धान्य त्यांना दररोज उपलब्ध होईल, असे पाहावे. याकरिता बर्ड फिडरमध्ये धान्य भरून ठेवावे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटक जपणे महत्त्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी.

आपल्या किलबिलाटाने आयुष्याचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व जपणं म्हणूनच गरजेचं आहे. नाही तर उद्याच्या पिढीला पुस्तकातून 'एक होती चिऊताई' असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी  चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करुया आणि इतरांनाही जागरुक करुया.