उष्माघात टाळण्यासाठी  आरोग्याची काळजी कशी घ्याल?

उष्णतेची लाट येत्या ७ दिवसांत वाढणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या तापमानाचा शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या दिवसांत उष्माघात टाळण्यासाठी  आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया, काही सोप्या टिप्स ज्याद्वारे तीव्र उन्हापासून रक्षण होण्यास मदत होईल.

पेय उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागते. घशाला कोरड पडते. त्यामुळे या दिवसांत डाळिंबाचे सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा उसाच्या रसाचे सेवन करावे. नारळाचे पाणी पिणेही फायदशीर ठरते. यामुळे निर्जलीकरणाचा धोका टळतो. फक्त पाणी पिणार असला, तर पाण्यासोबत गुळाचे सेवन फायदेशीर ठरते. बाहेरून घरी गेल्यावर लगेचच पाणी पिऊ नका. 

पाणी   या दिवसांत माठातले पाणी प्या. यामुळे शरीराला गारवा मिळतो. उष्णतेचे त्रास टाळायला मदत होते. पिण्याच्या पाण्यात वाळा,  सब्जा, अशा वनस्पती आणि पदार्थांचा समावेश करावा. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. इलेक्ट्रोलचे पाणी प्या. 

व्यायाम उन्हाळ्यात हलका व्यायाम करावा. शरीरात उष्णता वाढली असेल, तर व्यायाम कमी करावा. उनात फिरू नये. ज्यांना पोहायला आवडते. त्यांनी पोहण्याचा व्यायाम करावा. 

आहार या दिवसांत पचनशक्ती कमी होते. त्यामुळे रोजच्या आहारात पालेभाज्या, संत्र, टरबूज, नारळ, टोमॅटो ही पाण्याचे प्रमाण जास्त असलेली ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करा.  उन्हाळ्यात  शारीरिक उर्जा जास्त लागते. त्यामुळे पौष्टिक आणि पूरक आहाराचा समावेश करा तसेच उन्हाळ्यात बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेणे आवश्यक आहे.

झोप उन्हाळ्यात दूपारी झोपू नका. त्यापेक्षा झोपेची आणि सकाळी उठण्याची एक वेळ ठरवा.  सकाळी लवकर उठा. त्यामुळे रात्री लवकर झोप लागण्याची सवय लागेल.

कपडे उन्हाळ्याच्या दिवसांत हलके, मऊ आणि सुती कपडे घाला.  शक्यतो पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर जास्त प्रमाणात करा. उन्हाळ्यात घाम जास्त येतो म्हणून या दिवसांत सुती कपडे वापरावे. सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा तसेच गडद किंवा डार्क रंग टाळावेत.