Virat Kohli : विराटच्या शतकानंतर ड्रेसिंग रुममध्ये गंभीर, विराटची भावपूर्ण गळाभेट

Virat Kohli : यावर्षी आयपीएलमध्ये गंभीर आणि विराट यांच्यात जोरदार शाब्दिक चममक उडाली होती.

95
Virat Kohli : विराटच्या शतकानंतर ड्रेसिंग रुममध्ये गंभीर, विराटची भावपूर्ण गळाभेट
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने पर्थ कसोटी जिंकून बोर्डर-गावस्कर मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या पराभवानंतर भारतासाठी हा विजय मोलाचा आहेच. शिवाय या कसोटीत दुसऱ्या डावांत स्टार फलंदाज विराट कोहलीने आपलं ३० वं कसोटी शतक साजरं केलं. तो क्षणही विराटसह (Virat Kohli) ड्रेसिंग रुम आणि चाहत्यांना भावूक करणारा ठरला. दिग्गज फलंदाज अशी ओळख असलेला विराट कोहली अलीकडे मात्र कसोटी क्रिकेटमध्ये मागे पडत होता. यावर्षी १० डावांमध्ये त्याच्या नावावर होत्या अवघ्या १०४ धावा.

पर्थमध्ये त्याची कसोटी साजरी होण्यासाठी भारतीय संघ थांबला होता आणि त्यानंतर बदली कर्णधार जसप्रीत बुमराहने डाव घोषित केला. त्यानंतर अख्खं ड्रेसिंग रुम उभं राहून विराटचं अभिनंदन करत होतं आणि खेळाडू मैदानावर त्याच्या स्वागतासाठी आले. तसंच ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यावर गौतम गंभीरने विराटला घट्ट मिठी मारली. गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला तेव्हाच दोघांनी आपल्यातील भांडण संपवल्याचं जाहीर केलं होतं. पण, तरीही आयपीएल दरम्यान दोघांमध्ये झालेली वादावादी अजूनही लोकांच्या लक्षात असेल. विराटचं (Virat Kohli) हे सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून १०० वं शतक होतं. त्यामुळेही त्याला महत्त्व होतं. या शतकानंतर बीसीसीआयने ड्रेसिंग रुममधील भावना दाखवणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

(हेही वाचा – Sambhal मध्ये जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकावर मुसलमानांकडून दगडफेक; सपा खासदार, आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल)

विराटची पत्नी अनुष्का सामना पाहण्यासाठी मैदानावर हजर होती. ती ही काहीशी भावूक झाली होती. गंभीर आणि कोहली यांच्यात आयपीएल दरम्यान झालेले शाब्दिक वाद सगळ्यांनाच लक्षात असतील. पण, दोघांनीही ते मागे टाकलेले दिसत आहेत. गंभीरने विराटचं (Virat Kohli) ड्रेसिंग रुममध्ये स्वागत केलं आणि त्याला आलिंगनही दिलं. विराटने सामन्यानंतर या शतकाचं श्रेय आपली पत्नी अनुष्काला दिलं. ‘अनुष्का माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती म्हणून मी उभा राहू शकलो. माझ्या मनात नेमकं काय सुरू आहे, डोक्यात काय चाललंय आणि मी चुका केल्यावर मला होणारं दु:ख या सगळ्यात तिची मला साथ असते. त्यामुळे हे शतक तिचं आहे आणि त्याचबरोबर संघाचं आहे. कारण, संघासाठी मला योगदान द्यायचं होतं,’ असं विराट मीडियाशी बोलताना म्हणाला.

कसोटीमधील विराट कोहलीचं (Virat Kohli) हे ३० वं शतक आहे. आतापर्यंत ११९ कसोटींत ४८ धावांच्या सरासरीने त्याने ९,१४५ धावा केल्या आहेत. यात ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं आहेत. तर तीनही प्रकारात मिळून त्याने क्रिकेटमध्ये आजवर त्याने १०० शतकं केली आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.