US Open 2024 : खेळातील राग जेव्हा टेनिसपटू बॉलगर्लवर काढते…

US Open 2024 : कझाक खेळाडू युलिया पुतिनसेवावर असभ्य वर्तनासाठी टीका होत आहे.

110
US Open 2024 : खेळातील राग जेव्हा टेनिसपटू बॉलगर्लवर काढते…
  • ऋजुता लुकतुके

टेनिस हा सभ्य खेळ मानला जातो. पण, युएस ओपनमध्ये खेळावरील राग बॉलगर्लवर काढत कझाक खेळाडू युलिया पुतिनसेवाने असभ्यतेचं दर्शनच घडवलं आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या या प्रकाराची चर्चाही टेनिस वर्तुळात रंगली आहे. आणि खेळाडूंवर जरब रहावी अशा नियमांची मागणीही होत आहे. रविवारी पुतिनसेवा आणि इटलीची जस्मिन पाओलिनी यांच्या दरम्यानच्या सामन्यात हा प्रकार घडला. (US Open 2024)

बॉलगर्लने चेंडू पुतिनसेवाकडे सर्व्हिससाठी फेकला. पण, तो झेलण्याऐवजी पुतिनसेवाने तो रॅकेटने उलटा जमिनीवर आपटला. तो चेंडू पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्नही तिने केला नाही. या प्रकारामुळे सामनाही काही सेकंद थांबला. प्रेक्षकांना पुतिनसेवाची अखिलाडूवृत्ती अजिबात खपली नाही.

(हेही वाचा – जातीनिहाय जनगणनेबाबत काय आहे RSS ची भूमिका?)

सामना संपल्यानंतर जेव्हा पुतिनसेवा शांत झाली तेव्हा झाल्या प्रकाराबद्दल बॉलगर्लची तिने माफी मागितली. ‘बॉलगर्लशी मी जसं वागले, त्यासाठी मला तिची माफी मागायची आहे. ती मला चेंडू देत असताना मी विचित्र वागले. पण, खरंतर माझा राग तिच्यावर नव्हता. मी ज्या पद्धतीने खेळत होते, मी माझ्यावरच रागावले होते. ब्रेकपॉइंट वरून मी गेम हरले. त्याचं दु:ख झालं होतं. त्या नादात माझ्याकडून ते कृत्य घडलं.’ असं पुतिनसेवाने सामन्यानंतर म्हटलं. तिने या आशयाचं पत्रकही काढलं आहे. पुतिनसेवाने हा सामना ३-६ आणि ४-६ असा गमावला.

इटलीची जस्मिन पाओलिनी या स्पर्धेत पाचवी मानांकित खेळाडू आहे. या विजयासह ती चौथ्या फेरीत पोहोचली आहे. २०२४ मध्ये ती चांगलीच फॉर्मात आहे. यावर्षी प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धेत ती किमान चौथ्या फेरीपर्यंत पोहोचली आहे. (US Open 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.