Taekwondo Competition : सावरकर तायक्वांडो अकादमीच्या ५ जणांची आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Taekwondo Competition : तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा ३० ते ४ नोव्हेंबर दरम्यान हाँगकाँगला होणार आहे. 

114
Taekwondo Competition : सावरकर तायक्वांडो अकादमीच्या ५ जणांची आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
  • ऋजुता लुकतुके

मुंबईत दादर इथं असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात असलेल्या सावरकर तायक्वांडो अकादमीतील तब्बल ५ जणांची जागतिक तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा हाँगकाँग इथं पार पडणार आहे. सावरकर अकादमीत प्रशिक्षण घेणारे रुद्र खंदारे, काव्य धोडायानार, कियान देसाई आणि राजेश खिलारी यांची थेट निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. नाशिक इथं मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स स्पर्धेत या चारही जणांनी आपापल्या गटात जेतेपद पटकावलं आहे. तर येत्या २२ ऑक्टोबरला नवी दिल्लीत होणाऱ्या निलड चाचणी स्पर्धेत विहान अय्यरच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होऊ शकतं. एकाच अकादमीतून एकावेळी ५ खेळाडू भारतीय संघात निवडले जाणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे या यशाबद्दल सावरकर राष्ट्रीय स्मारकात या खेळाडूंचा अलीकडेच सत्कारही करण्यात आला. (Taekwondo Competition)

यातील ४ मुलं ही ज्युनिअर गटात तर राजेश खिलारी मास्टर्स गटात भारताचं प्रतिनिधित्व करतील. राजेश खिलारी हे सावरकर तायक्वांडो अकादमीचे मुख्य प्रशिक्षकही आहेत. मागच्या काही महिन्यात देशभरात झालेल्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीवरून भारतीय संघासाठी खेळाडूंची निवड झाली आहे. सावरकर अकादमीतील मुलांनी कानपूर, उत्तर प्रदेश इथं झालेल्या स्पर्धेत अव्वल कामगिरी करत आपलं राष्ट्रीय संघातील स्थान भक्कम केलं. तर राजेश खिल्लारी कटक, ओरिसा इथं झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल ठरले होते. त्याचबरोबर नाशिकच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स स्पर्धेतही या सगळ्यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावलं आहे. (Taekwondo Competition)

(हेही वाचा – Onion Express Train : कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी लासलगावहून ‘कांदा एक्स्प्रेस’ थेट दिल्लीला रवाना)

स्वत: प्रशिक्षक मुलांबरोबर स्पर्धेची तयारी करत असल्यामुळे खेळाडूंचाही उत्साह वाढल्याची पहिली प्रतिक्रिया प्रशिक्षक आणि मास्टर्स खेळाडू राजेश खिलारी यांनी दिली आहे. ‘मी मागचं वर्षभर विविध स्पर्धांची तयारी करत आहे आणि त्यात यशही मिळाल्यामुळे मुलांसमोर ते उदाहरण होतं. त्यामुळे अकादमी ५ वाजता सुरू होत असताना मुलं माझ्याबरोबर ३ वाजताच सराव सुरू करण्यासाठी स्वत:हून तयार झाली. वेळ प्रसंगी त्यांनी शाळाही बुडवली आणि तायक्वांडो स्पर्धेलाही शाळे इतकंच महत्त्व दिलं. वर्षभर दिवसातून ५ तास केलेला सरावच मुलांना उपयोगी पडला आहे. १२ ते १४ वयोगटातील या मुलांनी निर्भेळ यश मिळवलं आहे,’ असं राजेश खिलारी यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितलं. मुलांनी मिळवलेल्या या यशाचं कौतुक करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक इथं मुलांचा सत्कारही आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यावेळी उपस्थित होत्या. (Taekwondo Competition)

‘मुलांनी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून हे यश मिळवलं आहे. त्यामुळे इतरांसाठीही ते प्रेरणादायी आहे. या वयात एखाद्या गोष्टीची कास धरली तर कुठलंही उद्दिष्ट पूर्ण करता येतं हे मुलांनी दाखवलं आहे. आणि सावरकर अकादमीची मुलं आता राष्ट़्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजत आहेत. मुष्टियुद्ध, तिरंदाजी या इतर क्रीडा प्रकारातील प्रशिक्षणांर्थींनीही या मुलांकडून प्रेरणा घ्यावी,’ असं रणजीत सावरकर यावेळी बोलताना म्हणाले. शाळेबरोबरच खेळांनाही महत्त्व दिल्यामुळे सर्वांगीण विकास साध्य होतो याकडे सावकर यांनी तरुणांचं लक्ष वेधलं. (Taekwondo Competition)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.