प्रतिक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

101

महिला महाराष्ट्र केसरीसाठी शुक्रवारी झालेल्या लढतीत प्रतिष्ठेचा किताब सांगलीतल्या प्रतिक्षा बागडी हीन पटकावला आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटील हिच्यावर पराभव करून प्रतिक्षा पहिली वहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. प्रतिक्षाने वैष्णवीवर अवघ्या एका मिनिटांतच मात करत विजय संपादन केला.

या लढतीत प्रतिक्षाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला होता. सुरुवातीलाच प्रतिक्षाने दोन गुणांची कमाई केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा प्रतिक्षाने दोन गुण कमावले आणि आपली आघाडी ४-० अशी नेली होती. पण दुसरीकडे वैष्णवीदेखील प्रतिक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामध्ये ती यशस्वी ठरली. वैष्णवीने फक्त एक जोरदार चाल खेळली आणि चार गुणांची कमाई केली. त्यामुळे हा सामना ४-४ अशा बरोबरीत आला होता. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण त्यानंतर प्रतिक्षाने मानेवर एकेरी डाव टाकला आणि वैष्णवीला चीतपट करत प्रथम महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.

दरम्यान प्रतिक्षाला कुस्तीचे धडे तिचे वडील रामदास बागडी यांच्याकडून मिळाले. तिचे वडील जुन्या काळातील नामवंत मल्ल होते. ते सध्या सांगली पोलीस दलात कार्यरत आहेत. प्रतिक्षा सध्या वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे. आजवर प्रतिक्षाने तब्बल १२ वेळा राज्य स्पर्धेत पदके मिळवली असून २२ वेळा राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला आहे.

(हेही वाचा – आशिया कपचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे; भारतीय संघासाठी असेल का विशेष वेळापत्रक?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.