Paris Paralympic Games : नितेश कुमारला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण, योगेशला थाळीफेकमध्ये रौप्य

Paris Paralympic Games : एसएल३ प्रकारात बॅडमिंटन सुवर्ण जिंकणारा नितेश आयआयटी पदवीधर आहे. 

76
Paris Paralympic Games : नितेश कुमारला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण, योगेशला थाळीफेकमध्ये रौप्य
  •  ऋजुता लुकतुके

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा पदकांचा सिलसिला सुरूच आहे. पाचव्या दिवशी पॅराबॅडमिंटनपटू नितेश कुमारने भारताच्या ताफ्यात आणखी एका सुवर्णाची भर घातली. एसएल३ प्रकारात अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलला २१-१४, १८-२१ आणि २३-२१ असं हरवलं. टोकयोमध्ये प्रमोद भगतने भारताला सुवर्ण जिंकून दिलं होतं. तर यावेळी ही जबाबदारी नितेशने उचलली. महिलांच्या एसयु६ प्रकारात भारताची मनिषा रामदास कांस्य पदकाची लढत खेळणार आहे.

नितेश त्याच्या फॉर्ममुळे सुवर्णाचा दावेदार होताच. पण, प्रतिस्पर्धी बेथेलने त्याला झुंजवलं. खासकरून तिसरा गेमच जवळ जवळ १ तास चालला. अखेर २१-२१ बरोबरीनंतर सलग दोन गुण जिंकत नितेशने हा विजय मिळवला.

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : ‘भारतीय संघ ३-१ ने बोर्डर-गावसकर मालिका जिंकेल’ – सुनील गावसकर)

२९ वर्षीय नितेश हरियाणाचा आहे आणि मंडीच्या आयआयटीमधून त्याने पदवी मिळवली आहे. लहान असताना त्याला फुटबॉलचं वेड होतं. तो या खेळात नशीब आजमावतही होता. पण, एका रेल्वे अपघाताने त्याचं नशीब बदललं. २००९ मध्ये विशाखापट्टणम इथं धावत्या ट्रेनमधून तो खाली पडला. यात एक पाय त्याला गमवावा लागला. शिवाय अनेक महिने अंथरुणाला खिळून रहावं लागलं ते वेगळंच. यातून बाहेर पडत त्याने पदवीही पूर्ण केली. आणि बॅडमिंटन खेळात प्रावीण्यही मिळवलं. प्रॉस्टेथिक पाय घालून खेळणारा नितेश अनेकदा पायाने धड असलेल्या खेळाडूंनाही आव्हान देतो आणि जिंकून दाखवतो, अशी त्याची जिद्द आहे.

(हेही वाचा – MSRTC च्या ताफ्यात आतापर्यंत केवळ ६५ ई-बसगाड्या दाखल; दिरंगाईमुळे कंत्राट रद्द करण्याची मागणी)

दुसरीकडे, नितेशने आपलं सुवर्ण जिंकण्याच्या काही एखादा तास आधी योगेश कथुनियाने ॲथलेटिक्समध्ये भारताला तिसरं पदक मिळवून दिलं. एफ५६ प्रकारात थाळीफेकीत योगेशने रौप्य जिंकलं. ४२.२२ मीटरवर थाळीफेक करत योगेशने रौप्य आपल्या नावावर केलं. या प्रकारात ब्राझीलचा बतिस्ता ४६.८६ मीटरच्या फेकीसह पहिला आला. विशेष म्हणजे योगेशने टोकयो पॅरालिम्पिकमधील खेळाची पुनरावृत्ती करत सलग दुसरं रौप्य जिंकलं आहे. प्रतिस्पर्धी बतिस्ताने सुवर्ण जिंकताना नवीन पॅरालिम्पिक विक्रमही रचला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.