Novak Djokovic’s Next Target : अमेरिकन ओपन विजेतेपदानंतर आता जोकोविचला वेध पॅरिस ऑलिम्पिकचे

नोवाक जोकोविचने नुकतंच विक्रमी २४वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. पण, त्यानंतर त्याला वेध लागलेत ते पॅरिस ऑलिम्पिकचे!

21
Novak Djokovic’s Next Target : अमेरिकन ओपन विजेतेपदानंतर आता जोकोविचला वेध पॅरिस ऑलिम्पिकचे
Novak Djokovic’s Next Target : अमेरिकन ओपन विजेतेपदानंतर आता जोकोविचला वेध पॅरिस ऑलिम्पिकचे

ऋजुता लुकतुके

वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम अर्थात, अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकून नोवाक जॉकोविचने (Novak Djokovic) विक्रमी २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. पण, एका पदकाने त्याला अजूनही हुलकावणी दिली आहे. ते म्हणजे ऑलिम्पिक सुवर्णपदक. पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिक भरणार आहे. जोकोविचने आपलं पुढचं लक्ष्य ऑलिम्पिक विजेतेपद असल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वी २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जोकोविचने कांस्य पदक जिंकलं होतं. पण, त्यानंतर लंडन, रिओ आणि टोकयो ऑलिम्पिकमध्ये तो पदकाच्या जवळही जाऊ शकला नाही. त्यामुळे ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची त्याची इच्छा अजून अपूर्णच आहे.

पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिक रंगेल तोपर्यंत जोकोविच ३७ वर्षांचा झालेला असेल. पण, तो अजूनही तंदुरुस्त आहे. आणि वयाने त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या खेळाडूंना तो टक्कर देऊ शकतोय. आताही २०२३ मध्ये त्याने तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. जागतिक क्रमवारीत जोकोविच पहिल्या क्रमांकावर आहे. इतक्यात निवृत्त होण्याची इच्छा नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.

‘माझं पुढचं लक्ष्य ऑलिम्पिक सुवर्ण हेच आहे. आणि इथून पुढे मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आधी मला ऑलिम्पिक स्पर्धेत खेळता येईल, अशी मी आशा करतो. मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या त्यासाठी तयार असेन,’ असं जोकोविच (Novak Djokovic) व्हॅलेन्सिया इथं पत्रकारांशी बोलताना म्हणाला. जोकोविच सध्या डेव्हिस कप या सांघिक टेनिस स्पर्धेत त्याचा राष्ट्रीय संघ सर्बियाचं प्रतिनिधित्व करतोय.

(हेही वाचा- MLA Ravindra Waikar : ठाकरे गटातील आमदाराला मोठा धक्का! रवींद्र वायकर यांच्यासह पत्नीवर गुन्हा दाखल)

पुढील हंगाम आणि ऑलिम्पिकचं आव्हान सोपं नाही, याची जोकोविचला कल्पना आहे. ‘पुढील वर्षी मातीच्या कोर्टवर फ्रेंच ओपन होईल, मग गवतावर विम्बल्डन आणि पुन्हा मातीवर ऑलिम्पिक स्पर्धा होईल. आणि त्यानंतर पुढचे सामने हार्डकोर्टवर होतील. थोडक्यात, कोर्ट सारखी बदलतील. आणि या बदलांशी जुळवून घेणं हे मोठं आव्हान असेल,’ असं जोकोविच म्हणाला.

ऑलिम्पिक बद्दल मात्र जोकोविचला (Novak Djokovic) प्रचंड उत्सुकता आहे. अशा स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करता येतं ही गोष्ट त्याला प्रेरणा देते. जोकोविच अशा कमी अव्वल व्यावसायिक खेळाडूंपैकी आहे, जे न चुकता डेव्हिस कप आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करतात.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.