Ind vs NZ, 1st Test : बंगळुरू कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला हव्या १०७ धावा

Ind vs NZ, 1st Test : कसोटीचा रविवारी शेवटचा दिवस बाकी आहे.

122
Ind vs NZ, 1st Test : बंगळुरू कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला हव्या १०७ धावा
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली कसोटी अखेर चौथ्या दिवसाच्या शेवटी न्यूझीलंडच्या बाजूने पूर्णपणे झुकली आहे. कारण, सर्फराझ खान आणि रिषभ पंत यांनी झुंजार लढत दिली असली तरी नवीन चेंडूवर ओरोर्क आणि मॅट हेन्री यांनी भारताचे उर्वरित ६ फलंदाज ५४ धावांमध्येच बाद केले. त्यामुळे भारताचा दुसरा डाव ४६२ धावांत गुंडाळला गेला. भारताकडे १०६ धावांची आघाडी असल्यामुळे न्यूझीलंडला कसोटी जिंकण्यासाठी १०७ धावांचं आव्हान मिळालं आहे. कसोटीचा रविवारचा अख्खा दिवस बाकी आहे.

न्यूझीलंडला १९८८ नंतर भारतात पहिल्यांदा कसोटी जिंकण्याची संधी चालून आली आहे. इथं खेळलेल्या ३७ कसोटींपैकी त्यांनी फक्त २ जिंकल्या आहेत. रविवारी पावसामुळे खेळ होऊ शकला आणि खेळपट्टीनेही पुरेशी साथ दिली तर ते तिसरी कसोटी जिंकू शकतील. त्यापूर्वी कसोटीच्या चौथ्या दिवशी सर्फराझ आणि रिषभ पंत यांनी पहिली दोन सत्र व्यवस्थित खेळून काढली. षटकामागे ५ धावांच्या गतीने धावा करत त्यांनी १७७ धावांची भागिदारी केली. आणि ४०० धावांचा टप्पाही भारताला गाठून दिला. सर्फराझने कसोटीतील पहिलं दीडशतक ठोकलं. पण, १५० धावांवर तो बाद झाला.

(हेही वाचा – Sawantwadi Assembly : तेलींच्या प्रवेशामुळे परबांचा पत्ता कट?)

भारतीय संघ तेव्हाही ४ बाद ४०४ असा सुस्थितीत होता. पण, न्यूझीलंडने नवीन चेंडू घेतला. आणि त्याने अचानक डावाला कलाटणी मिळाली. मॅट हेन्री आणि ओरुर्क यांची गोलंदाजी प्रभावी ठरायला लागली. आधी ओरुर्कने सर्फराझला बाद केलं. त्यानंतर के एल राहुल आणि रिषभ पंत हे महत्त्वाचे बळीही त्यानेच मिळवले.

पंत ९९ धावांवर त्रिफळाचीत झाला. अश्विन, राहुल आणि कुलदीप यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, अखेर भारतीय संघ ४६२ घावांवर गुंडाळला गेला. ओरुर्क आणि हेन्री यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. पहिल्या दोन सत्रांमध्ये हा सामना भारताच्या बाजूने झुकलेला दिसत असताना न्यूझीलंडने कसोशीने सामन्यात पुनरागमन केलं आहे. शनिवारी जोरदार पावसामुळे खेळ थांबला असला तरी रविवारी पावसाने फारसा उपद्रव दिला नाही तर न्यूझीलंडला विजयाची चांगली संधी आहे. रविवारी बंगळुरूमध्ये पावसाचा अंदाज असला तरी सकाळच्या पहिल्या सत्रात खेळ होऊ शकतो. त्यामुळे खेळपट्टीने साथ दिली तर १०७ धावांचा टप्पा पार करणं न्यूझीलंडला कठीण नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.