ICC Hall of Fame : ॲलिस्टर कूक, एबी डिव्हिलिअर्स आणि नीतू डेव्हिड आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये

ICC Hall of Fame : आयसीसी हॉल ऑफ फेममधील नीतू डेव्हिड ही दुसरी भारतीय महिला आहे.

98
ICC Hall of Fame : ॲलिस्टर कूक, एबी डिव्हिलिअर्स आणि नीतू डेव्हिड आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात, आयसीसीने यंदा आपल्या मानाच्या हॉल ऑफ फेम यादीत एबी डिव्हिलिअर्स, ॲलिस्टर कूक आणि नीतू डेव्हिड यांचा समावेश करण्याचं ठरवलं आहे. १९९० आणि २००० च्या दशकांत या खेळाडूंनी आपापल्या संघांसाठी मोलाची भूमिका बजावली आहे. एबी डिव्हिलिअर्सने दक्षिण आफ्रिकेसाठी २०,००० च्या वर आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तर इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूक इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. नीतू डेव्हिडनेही भारतीय महिला क्रिकेटची दीर्घकाळ सेवा केली आहे. आणि १४१ आंतरराष्ट्रीय बळी मिळवले आहेत.

नीतू डेव्हिड ही डायना एडलजी यांच्यानंतर हॉल ऑफ फेममध्ये प्रवेश करणारी फक्त दुसरी महिला भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. तर ॲलिस्टर कूकला सर उपाधी मिळाली आहे. आणि काही वर्षांपूर्वी निवृत्त झाला तेव्हा १२,४७२ धावांसह इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज म्हणून तो निवृत्त झाला. अगदी अलीकडे जो रुटने त्याला मागे टाकलं आहे.

(हेही वाचा – Jammu and Kashmir ला राज्याचा दर्जा मिळणार ? काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?)

एबी डिव्हिलिअर्सला मि. ३६० म्हटलं जायचं. कारण, मैदानाच्या सर्व दिशांनी फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे होती. द आफ्रिकन संघासाठी तो ११४ कसोटी २७८ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामने खेळला. १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने २०,००० च्या वर आंतरराष्ट्रीय धावा केल्या. तर नीतू डेव्हिड भारतासाठी १०० सामने खेळली. यात तिने १४१ आंतरराष्ट्रीय बळी मिळवले. ही कामगिरी करणारी ती भारताची दुसरी यशस्वी महिला क्रिकेटपटू आहे.

(हेही वाचा – ICC Test Ranking : पाक विरुद्धच्या त्रिशतकानंतर हॅरी ब्रूकने विराट कोहलीलाही टाकलं मागे)

‘हॉल ऑफ फेमच्या निमित्ताने दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत मला बसवलं जाणार आहे. त्यासाठी माझा विचार होणं हेच माझ्यासाठी खूप आहे. मला आणखी विनम्र करणारं आहे. त्यासाठी मी आयसीसीचे आभार मानते. माझे प्रशिक्षक, कुटुंबीय यांचे ऋण व्यक्त करते,’ असं नीतू डेव्हिडने म्हटलं आहे. तर डिव्हिलिअर्स आणि कूक यांनीही या सन्मानासाठी आनंद व्यक्त केला आहे.

याच आठवड्याच्या शेवटी दुबईतील कार्यक्रमात या तिघांना सत्कार करून त्यांना हॉल ऑफ फेममध्ये अधिकृतपणे समाविष्ट केलं जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.