World Heart Day 2024 : मुंबईत ११ टक्के मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने

महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये १,००,००० हून अधिक रुग्ण मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता उपचार घेत आहेत. आहार विषयक समुपदेशन सेवा सर्व दवाखान्यात सुरू असून त्यामध्ये ८७,००० रक्तदाब व मधुमेही रूग्णांना सल्ला देण्यात आला आहे.

731
हृदयरोग हे जगभरात मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. मुंबईतील २०२३ मधील जन्म-मृत्यू नोंदणी व मृत्यूच्या कारणांचे अहवालानुसार, मुंबईत एकूण मृत्यूपैकी ११ टक्के मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (Acute Myocardial Infarction) होत आहेत.
हृदयाशी संबंधित आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने जगभरात २९ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक हृदय दिन’ (World Heart Day 2024) म्हणून साजरा केला जातो. ‘हृदयाचा वापर कृतीकरिता करा’ (Use Heart for Action) ही वर्ष २०२४ करिता जागतिक हृदय दिनाची संकल्पना आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत रविवार, २९ सप्टेंबर २०२४ पासून हृदयरोग व पोषक आहार याविषयी जनजागृती करण्याकरीता ‘जागतिक हृदय दिन’ निमित्त पोस्टर व समाजमाध्यमांवर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
‘जागतिक हृदय दिन’ (World Heart Day 2024) निमिताने नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत योग्य बदल करावा. तसेच २४ विभागांमध्ये सुरू केलेल्या योगा केंद्राचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी समस्त मुंबईकरांना उद्देशून केले आहे. मुंबईतील नागरिकांनी स्वतःचे व कुटुंबियांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याकरीता ‘वेळीच व्हावे दक्ष आणि द्यावे हृदयाकडे लक्ष’, या उक्तीनुसार कृती करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.  दक्षा शाह यांनी सांगितले की, प्रत्येक ३० वर्षावरील नागरिकांनी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची नियमित तपासणीसाठी महानगरपालिकेच्या दवाखाना व आपला दवाखाना येथे भेट द्यावी. तसेच छातीत दुखणे व हृदयरोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात संपर्क साधावा, असे त्या म्हणाल्या.
हृदयरोग व संबंधित आजारांकरीता…महानगरपालिकेच्या वतीने, जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) स्टेप्स सर्वेक्षण’ २०२१ नुसार मुंबईत १८-६९ वर्षे वयोगटातील, ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब, १८ टक्के जणांमध्ये मधुमेह असल्याचे आढळले आणि सुमारे २१ टक्के व्यक्ती वाढलेल्या कोलेस्ट्रॉलसाठी औषधोपचार घेत असलेले निदर्शनास आले आहे. तसेच सुमारे ३७ टक्के व्यक्तींमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे (CVD) जोखीम घटकांपैकी तीन किंवा अधिक जोखीम घटक असल्याचे नोंदवले गेले.

जोखमीचे घटक कोणते?

  • दररोज धूम्रपान
  • वाढलेला रक्तदाब व मधुमेहासाठी औषधोपचार
  • लठ्ठपणा
  • अपुरा शारीरिक व्यायाम
  • शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा कमी फळे आणि भाज्या खाणे

रक्तदाब, मधुमेहाचे एवढे रुग्ण

मुंबईत ३० वर्षांवरील व्यक्तींचे आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यासाठी ऑगस्ट २०२२ पासून २६ रुग्णालयांमध्ये ‘विशेष रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र’ (NCD Corners) सुरु केले आहेत. यात, ऑगस्ट २०२४ पर्यंत ४ लाख ५ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ९.०५ टक्के रक्तदाबाचे तर १२.३३ टक्के मधुमेहाचे संशयित रुग्ण आढळले आहेत व पाठपुरावा सुरू आहे.
त्याचप्रमाणे, सर्व विभागांमध्ये घरोघरी लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण (Population Based Screening Survey) अंतर्गत मागील दीड वर्षात ३० वर्षावरील नागरिकांमध्ये एकूण २१,६०,०००  व्यक्तिंची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये देखील १८,००० उच्च रक्तदाबाचे नवीन रुग्ण आढळले आहेत व त्यांना दवाखान्यात संदर्भित करण्यात येत आहेत.

या मोहिमेत विविध प्रकारचे संदेश  देण्यात येणार  

  • हृदयरोग व संबंधित आजारांकरीता जोखमीचे घटक उदा. मद्यपान टाळणे, तंबाखू सेवन टाळणे तसेच योग्य आहार व नियमित व्यायाम करणे.
  • हृदयरोगाच्या जोखमीचे मूल्यमापन करण्यासाठी नियमित मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी व योग्य वैद्यकीय सल्ला घेणे.
  • हृदयरोगाची लक्षणे व छातीत दुखत असल्यास वेळेत रुग्णालयास भेट देणे.

महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये १,००,००० हून अधिक रुग्ण मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता उपचार घेत आहेत. आहार विषयक समुपदेशन सेवा सर्व दवाखान्यात सुरू असून त्यामध्ये ८७,००० रक्तदाब व मधुमेही रूग्णांना सल्ला देण्यात आला आहे. जून २०२२ पासून, २४ विभागात एकूण ११४ शिव योग केंद्र कार्यरत आहे, त्यात ३३,४७४ मुंबईकरांनी योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. एकूणच, विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते आपल्या जीवनशैलीत आवश्यक सकारात्मक बदल घडवू शकतात. परिणामी, हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.