Veer Savarkar Jayanti 2023: धर्म स्वातंत्र्यवीर सावरकरांचा

158
धर्म स्वातंत्र्यवीर सावरकरांचा
धर्म स्वातंत्र्यवीर सावरकरांचा

डॉ. गिरीश दाबके

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या अनेक श्रेष्ठ कवितांमध्ये ‘धर्म’ ही संज्ञा ‘कर्तव्य’ या अर्थानेच आविष्कृत केली आहे. ‘माझा धर्म कठोर आहे’, ‘माझा धर्म माझ्याकडे रोखून पहात होता’, ‘आज माझ्या मालकाने (धर्माने) माझ्यासाठी काही वेगळीच आज्ञा सोडली आहे‘, ‘धर्मरूपी विप्राने मला आज्ञा सोडली’, अशा विविध अभिव्यक्तींच्या माध्यमातून वीर सावरकरांनी ‘धर्म’ म्हणजे ‘कर्तव्य’ हीच जाणीव व्यक्त केली आहे.

वीर सावरकरांच्या अनेक कवितांमध्ये ‘देव’ येतो. पण तो देव ‘प्रेरक’ असतो. ‘तारक’ नसतो. ‘मी पापी आहे’, ‘हा जन्म हे एक ओझं आहे,’ ‘मला वाचव, मला सोडव’ अशा प्रकारची आर्तता वीर सावरकरांच्या अभिव्यक्तीत कधीही नसते. अंदमानात जेव्हा धीर अगदी संपतच आला आणि ‘आता का आणि कशासाठी जगायचं?’ असा कोलाहल जेव्हा मनात थैमान घालू लागला तेव्हा देखील वीर सावरकरांच्या कवितेत दु:ख येतं, निराशा येते, पण कधीही पश्चात्ताप येत नाही. ‘देवाची आज्ञा प्रमाण मानून मी हे क्रांतीकार्य स्वीकारले आहे,’ आता कोणताही संदेह नाही, संभ्रम नाही, आता केवळ कर्तव्य शेष आहे. तोच माझा देव आहे. तोच माझा ‘धर्म’ आहे. अशी लोकविलक्षण मांडणी येते. तेव्हा वीर सावरकरांच्या दृष्टीने देव आणि धर्म ह्या एकरूप संकल्पना आहेत आणि ह्या दोन्ही संकल्पना केवळ आणि केवळ कर्तव्याशीच निगडित आहेत. देवांनी भरलेल्या देव्हाऱ्यात वीर सावरकरांनी ‘देश आणि स्वातंत्र्यलक्ष्मी’ अशा दोन दैवतांची भर घातली आणि आजन्म ह्याच दोन दैवतांची पूजा केली, आराधना केली. ही साधना करीत असताना ‘वरम जनहितं ध्येयम न केवला जनस्तुति’ हे तत्त्व वीर सावरकरांनी शिरोधार्य मानले. कर्तव्य आणि देशसेवा नावाचे दोन टाळ हातात घेऊन वीर सावरकरांनी आजन्म राष्ट्रभक्ती केली. पण ह्या लेखाच्या संदर्भात तरी आत्ता आपण ह्या कर्तव्यरूपी धर्माचा, किंवा वीर सावरकरांच्या व्यक्तीगत श्रद्धेचा विचार करणार नसून, केवळ सामाजिक धर्माचा विचार करणार आहोत.

धर्म एक पण देश अनेक, अशी उदाहरणे आज जगात आहेत. उदाहरणार्थ जगातील अनेक देशांचा धर्म ‘मुसलमान’ आहे. त्याचप्रमाणे ‘ख्रिश्चन’ धर्माचे समाज विविध देशांत आहे. बौद्ध धर्म ही काही देशांत आहे. पण भारत हा एकमेव देश असा आहे की, या देशात आमची परंपरा, आमचा इतिहास, आमचा धर्म, आमची संस्कृती आणि आमची श्रद्धास्थानं एकरूप झाली आहेत. हे पाचही घटक इतक्या एकजीवपणे एकरूप झाले आहेत की, त्यांचा वेगळा वेगळा विचार होऊच शकत नाही. त्यांना वेगळे अस्तित्वच नाही. प्राण पाच असावेत, पण देह एक असावा असे हे सायुज्ज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सतत ह्या ‘धर्मा’विषयी बोलत असतात. हा समष्टीचा धर्म आहे. हा ह्या देशाचा धर्म आहे. हा किमान दहा हजार वर्षं प्राचीन असणारा धर्म आहे.

(हेही वाचा – मार्सेलिस येथे उभारण्यात येणाऱ्या वीर सावरकर स्मारकासंदर्भात राहुल नार्वेकरांनी अमित शहांची घेतली भेट)

अनेक दैवतं येतील आणि जातील, अनेक महापुरुष आपापल्या विचारधनाने ह्या भूमीच्या आकलनाला समृद्ध करतील आणि जातील, अनेक ग्रंथ आपापली भर घालतील आणि काळाच्या उदरात अंतर्धान पावतील, अनेक वंश येतील, या भूमीवर बहरतील, त्यांचे त्यांचे वंशज मोठ्या सुखा समाधानात ह्या देशी वास करतील आणि काळाच्या पडद्यामागे जातील, पण हा देश हा ‘धर्म’ असाच चैतन्यमय राहील. सदा नवनव उन्मेषशालीनच राहील, कारण देशभक्ती हाच आमच्या धर्माचा पाया आहे. मातृभूमीची आराधना हेच आमचे खरे श्रद्धास्थान आहे. कारण तोच आमचा धर्म आहे. तेच आमचे हिंदुत्व आहे.

वीर सावरकरांना हा ‘धर्म’ अपेक्षित आहे. (ह्या धर्माच्या आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या रक्षणासाठी वीर सावरकरांनी हिंदूमहासभेच्या माध्यमातून राजकीय पातळीवर जो काही चमत्कार घडवून आणला, तो एका स्वतंत्र प्रदीर्घ लेखाचा विषय आहे. पण तो आता आपला विषय नाही.) त्याला सतत प्रगतीचे वेध लागलेले असतील. मानवता, समानता आणि बंधुत्व हा त्याचा पाया असेल. विज्ञाननिष्ठा हे केवळ घोषवाक्य नसेल, तर तो आमचा दैनंदिन व्यवहार असेल. आम्ही समृद्ध तर असूच पण उन्नतही असू. आमची तलवार सिद्ध असेल, पण तिच्यावर कुंडलीनीची पूर्ण छाया असेल. आमच्या काया सुंदर असतीलच, पण आमचे आत्मे अधिक गोमटे असतील, शुद्ध असतील. तो आमचा धर्म असेल. ते हिंदुत्व असेल. वीर सावरकरांनी ह्या हिंदुत्वाची अहर्निश चिंता वाहिली. वीर सावरकरांनी ‘धर्म’ पाहिला तो ह्या स्वरूपात पाहिला. वीर सावरकरांच्या हिंदुत्व-दर्शनाला नम्र अभिवादन करून हा लेख इथेच पूर्ण करतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.