केंद्रीय मंत्र्यांचा अपघात; भरधाव ट्रकने कारला उडवले

24

कर्नाटकाच्या विजयपुरा येथे गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती या कारने जात असताना मागून प्रचंड वेगाने आलेल्या ट्रकने साध्वी निंरजन ज्योती यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी प्रचंड होती की या अपघातात ट्रकच पलटी झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात साध्वी निरंजन ज्योती यांना आणि त्यांच्या चालकाला मार लागला आहे.

विजयपुरा येथील नॅशनल हायवे-50 वर गुरुवारी रात्री हा अपघात झाला. साध्वी निरंजन ज्योती इनोव्हा कारमधून जात होत्या. इतक्यात लोखंडी सळ्यांनी भरलेल्या एका ट्रकने या कारला जोरादार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ट्रकच पलटी झाला. निरंजन ज्योती यांच्या कारच्या बोनेटचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, निरंजन ज्योती आणि चालकाला मार लागला आहे. दोघांवरही सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या तर प्रशासन सज्ज; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती )

ट्रक चालक ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. ट्रक चालक दारु पिऊन ट्रक चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्नाटकात भाजपने संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी साध्वी निरंजन ज्योती आल्या होत्या. त्यावेळी हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. देवाच्या कृपेने मी सुरक्षित आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे आमची कार ट्रकखाली आली नाही. मात्र, आम्हाला किरकोळ मार लागला आहे,असे निरंजन ज्योती म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.