Veer Savarkar : अंश तू माझा, वंश तू माझा…स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार स्वीकारताना भावविभोर झाल्या हुतात्मा मेजर कौस्तुभ राणेंच्या आई

रविवार, २१ मे २०२३ रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आले.

155

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे (मरणोत्तर पुरस्कार) यांना प्रदान करण्यात आला. मेजर कौस्तुभ राणे यांचे वडील प्रकाश राणे आणि आई ज्योती राणे या दोघांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी ज्योती राणे अत्यंत भावविभोर झाल्या. आपल्या पराक्रमी मुलाचे शौर्य शब्दांत मांडताना परमेश्वराने आपल्या पोटी असा वीर पुत्र जन्माला घातला त्याबद्दल त्यांनी परमेश्वराचे आभार मानले. अंश तू माझा, वंश तू माझा, कुशीत माझ्या जन्म घेतला। भाग्य माझे थोर म्हणोनि तुझ्यासारखा पुत्र लाभला। हृदयी निरंतन तुझी आठवण, चिरंजीव तू स्वकर्तुत्वाने, उन्नत होई अमुचा माथा तुज विषयीच्या अभिमानाने।, अशा काव्य पंक्तीने ज्योती राणे यांनी मेजर कौस्तुभ राणे यांच्या विषयी गौरवोद्गगार काढले.

रविवार, २१ मे २०२३ रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा swatantryaveer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृती पुरस्कार घोषित)

वीर सावरकर यांच्या नावे शौर्य पुरस्कार मिळणे भाग्याचे!

कौस्तुभने देशासाठी केलेला त्याग, त्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने कौस्तुभला जो शौर्य पुरस्कार प्रदान केला, त्याबद्दल स्मारकाचे आम्हा कुटुंबियांकडून आभार मानते. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे आपल्या देशामध्ये होऊ गेलेल्या श्रेष्ठ महापुरुषांच्या मालिकेतील लखलखते तेजस्वी रत्न, क्रांती मंत्राचे उद्गाते, प्रखर देशभक्त! त्यांच्या नावे शौर्य पुरस्कार मिळणे ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. हा पुरस्कार जर कौस्तुभला स्वतःला स्वीकारता आला असता तर जास्त आनंद वाटला असता, त्याला दोन-दोन सेना मेडल जाहीर झाली, पण ते मेडल त्याला स्वतः स्वीकारता आली नाहीत. ईश्वरइच्छा! कौस्तुभची पत्नी आमची सून कनिका ही कौस्तुभचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात भरती झाली आहे. आता ती कॅप्टन पदावर आहे. कौस्तुभचा मुलगा आमचा नातू हाही सैन्याच्या वातावरणात आहे. त्याच्याही मनावर सैन्याचे संस्कार होत आहेत. आमची मुलगी ही कौस्तुभच्या मागे त्याची भूमिका बजावत आहे. कौस्तुभकडून मला कठीण प्रसंगात उभे राहण्याची प्रेरणा मिळत आहे. मी परमेश्वराचे नेहमी आभार मानते की, मला अशा सुपुत्राची आई होण्याचे भाग्य मिळाले आहे. कौस्तुभ सारखेच अनेक तरुण तयार व्हावेत आणि ते सैन्यात जावेत, अशी अपेक्षा करते, असे मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती राणे म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.