RSS: विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत सहस्त्रबुद्धे यांचे निधन

सहस्रबुद्धे यांचा जन्म १७ एप्रिल १९६६ रोजी गिरगाव (मुंबई) येथे झाला होता. त्यांना घरातूनच संघकार्याचा वारसा मिळाला होता.

211

विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांचे शुक्रवारी, २ जून रोजी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. गेल्या वर्षी झालेल्या रस्ते अपघातानंतर ते आजारी होते.

सहस्रबुद्धे यांचा जन्म १७ एप्रिल १९६६ रोजी गिरगाव (मुंबई) येथे झाला. त्यांना घरातूनच संघकार्याचा वारसा मिळाला होता. वडील श्रीकांत सहस्त्रबुद्धे हे आजही संघकार्याशी जोडलेले आहेत. मुंबई विश्वविद्यालयातून बी. एससी. इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर येथे काही काळ नोकरी केली. त्यानंतर १९८९ मध्ये ते नोकरी सोडून पूर्णवेळ संघ प्रचारक बनले. सहस्रबुद्धे यांच्याकडे २००९ पासून विज्ञान भारतीच्या राष्ट्रीय संघटन सचिव पदाचे दायित्व होते.

जयंत सहस्रबुद्धे यांच्या निधनावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जयंत सहस्रबुद्धे यांच्या निधनाची अत्यंत दु:खद बातमी तृतीय वर्षाच्या दीक्षांत समारंभाच्या समारोपानंतर मिळाली. अचानक लागलेल्या धक्क्याने आम्ही सर्वच स्तब्ध झालो आहोत. बरोबर नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतर त्यांच्या तब्येतीत झालेल्या खात्रीशीर प्रगतीची बातमी आनंददायी होती. एक-दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही ते पुन्हा एकदा हळूहळू त्यांचा सहवास आपल्या कार्यकर्त्यांना देऊ शकतील, असे आम्हा सर्वांना वाटत होते.

(हेही वाचा Tukaram Munde : अवघ्या महिनाभरात ‘आयएएस’ तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; दीपक केसरकरांच्या विभागाची धुरा सांभाळणार)

डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत होते. घरातील सदस्यांचे सेवा करण्याचे कार्य सुरूच होते. स्थानिक स्वयंसेवकांचेही सहकार्य वेळोवेळी मिळत होते. मात्र देशभरातील कार्यकर्त्यांची प्रार्थना होत असूनही उलटच घडले. आठवडाभरात प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी आज अचानक निजधामकडे प्रस्थान केले. आपल्या सर्वांचे, विज्ञान भारतीच्या हजारो कार्यकर्त्यांचे आणि विशेषत: त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन कसे करायचे? नियतीचा हा क्रूर खेळ विधिलिखित आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना करत मी माझ्या वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हणत त्यांनी आदरांजली अर्पण केली.

विज्ञान भारतीच्या कार्याला दिली नवी उंची

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक आणि सुमारे ४० वर्षांपासून मित्र असलेले, असामान्य प्रज्ञा आणि प्रतिभेचे धनी जयंत सहस्रबुद्धे यांच्या अकाली मृत्यूची वार्ता अत्यंत वेदनादायक आहे. जयंतजींनी विज्ञान भारतीच्या कार्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. दिवंगत कार्यकर्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.