कुर्ला रेल्वे पोलिसांनी १२ तासांत उघडकीस आणला अपहरणाचा गुन्हा, महिलेला अटक

105

कुर्ला रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालया जवळून अपहरण करण्यात आलेल्या ५ वर्षांच्या मुलाची कुर्ला रेल्वे पोलिसांनी १२ तासांच्या आत गोरेगाव वनराई येथून सुखरूप सुटका करून एका २६ वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. मुलाचे अपहरण करण्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

कुर्ला रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी आली

अपहरण करण्यात आलेला ५ वर्षांचा मुलगा कुटुंबासह टिटवाळा येथे राहण्यास आहे, या कुटुंबाचे हातावरचे पोट आहे. मुलाची आई ८ महिन्यांची गर्भवती असून देखील ती कॅटरिंगच्या कामासाठी मुलाला घेऊन कुर्ला जरीमरी येथे आली होती. शनिवारी रात्री उशिरा ही महिला आपल्या मुलासह घरी जाण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी आली होती, परंतु उशीर झाल्यामुळे शेवटची ट्रेन निघून गेल्यामुळे ती मुलासह कुर्ला फलाट क्रमांक १ जवळ असणाऱ्या तिकीट बुकिंग कार्यालयाच्या बाहेर सकाळच्या पहिल्या ट्रेनची वाट पहात बसली होती, त्यानंतर तिला झोप लागली व मुलगा खेळत होता.

(हेही वाचा पुरातत्व विभागाचे अधिकारीच गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणाला जबाबदार!)

तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पहाटे ४ वाजता तिला जाग आली, मात्र मुलगा जवळ दिसत नसल्याचे बघून ती घाबरली व तिने मुलाचा सर्वत्र शोध घेतला मुलगा कुठे दिसून येत नसल्याचे बघून तिने एका मैत्रिणीला फोन केला व तिच्या मैत्रिणीने तिला टिटवाळा येथे येण्यास सांगितले. टिटवाळा येथून ती पुन्हा कुर्ला येथे मुलाचा शोध घेण्यासाठी आली रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध घेऊन मुलगा मिळून येत नसल्याचे बघून रविवारी रात्री १० वाजता ती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे अंमलदार यांना देऊन मुलाच्या शोधासाठी सपोनि. राठोड यांचे पथक तयार करून मुलाचा शोध सुरु केला. सपोनि राठोड यांनी रेल्वेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे दिसून आले, ही महिला कॅटरिंग येथे होती, अशी माहिती मुलाच्या आईने दिली, मात्र ती कुठे राहते तिचे नाव काय याबाबत सविस्तर माहिती तिच्याकडे नव्हती.

मुलाची सुखरूप सुटका करून महिलेला अटक केली

पोलिसांनी कॅटरिंग सुपरवायझर यांचा नंबर मिळवून त्याच्यकडे चौकशी केली असता या महिलेचा मोबाईल क्रमांक मिळून आला. पोलिसांनी या महिलेचे लोकेशन तपासले असता तिचे शेवटचे लोकेशन गोरेगाव वनराई येथे मिळून आले. पोलिसांनी वनराई येथे शोध घेऊन अपहरण करण्यात आलेल्या मुलाची सुखरूप सुटका करून या महिलेला अटक करण्यात आले आहे. रुबिना (२६) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मुलाचे अपहरणाचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरु असल्याची माहिती वपोनि. शार्दूल यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.