Eknath Shinde : नालेसफाईच्या कामाबाबत जनतेकडून मागवणार अभिप्राय आणि छायाचित्रे; मुख्यमंत्र्यांच्या सुचनेची प्रशासन करणार अंमलबजावणी

अंधेरी गोखले पुलाच्या बांधकामाचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाहणी केली.

45
Eknath Shinde : नालेसफाईच्या कामाबाबत जनतेकडून मागवणार अभिप्राय आणि छायाचित्रे; मुख्यमंत्र्यांच्या सुचनेची प्रशासन करणार अंमलबजावणी

नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे झाली की नाही, याची तपासणी करण्यासाठी जनतेकडून अभिप्राय मागवावेत. तसेच जनतेकडून नाल्यांचे छायाचित्र मागवून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केल्यानंतर जूनमधील पहिल्या दहा दिवसात जनतेकडून अभिप्राय मागवून त्यादृष्टीने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री यांना दिले. त्यासोबतच आता, मुंबईतील रस्त्यावरील कचर्‍याची तक्रार नोंदवण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून ऑनलाईन प्रणाली येत्या सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाDemonetisation : २ हजारांच्या नोटा चलनातून बंद; मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची पाहणी केली. यामध्ये त्यांनी मिलन भूयारी मार्ग (सांताक्रुझ), गोखले पूल (अंधेरी पूर्व), ओशिवरा नदी (लिंक रोड, अंधेरी पश्चिम), पोयसर नदी, लिंक रोड (कांदिवली पश्चिम), दहिसर नदी (आनंदनगर पूल), दहिसर पूर्व व पश्चिम नदी पुनरुज्जीवन (बोरिवली पूर्व), श्रीकृष्ण नगरालगत संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य (बोरिवली पूर्व) येथे पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी, मुंबईतील नागरिकांना महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांवर अभिप्राय नोंदवता यावा, त्यासोबतच रस्त्यांवरील कचर्‍याची तक्रार करता यावी, यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या या पाहणी दौऱ्यात राज्याचे पर्यटन, महिला आणि बाल कल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रवीण दरेकर, योगेश सागर, अमित साटम, प्रकाश सुर्वे यांची उपस्थिती होती. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजीत ढाकणे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले ,उपआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ.भाग्यश्री कापसे, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण तसेच इतर संबंधित सर्व अधिकारी या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

हेही पहा – 

ओशिवरा नदी पूल येथे मुख्यमंत्री महोदयांनी गाळ लवकरात लवकर पूर्णपणे काढावा, तसेच गाळ काढण्यासाठी बकेटचा वापर करावा, अशीही सूचना केली. याठिकाणी कार्यरत कामगारांसोबत मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) संवाद साधला, त्यांची विचारपूस करून त्यांना चांगल्या कामाबद्दल शाबासकीही दिली.

नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या

पोईसर नदीपात्रात मुसळधार पावसावेळी प्रवाह वाढून आजूबाजूचा परिसर जलमय होतो. त्याप्रसंगी काठावरील नागरिकांना त्याचा त्रास होतो, अशी बाब निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर, मुख्यमंत्री (Eknath Shinde) श्री. शिंदे यांनी या नदीपात्रातील गाळ देखील त्वरेने उपसून यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली.

गोखले पुलाच्या कामाला गती द्यावी

अंधेरी गोखले पुलाच्या बांधकामाचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाहणी केली. स्टील ब्रीजचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी ब्रीज निर्मात्या कंपनीसोबत स्वतः संपर्क साधून सूचना देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. त्यासोबतच रेल्वेचा पूल पादचारी नागरिकांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून दिवाळीपूर्वी तो नागरिकांना खुला करून देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.