राज्यात लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी सरकार विचाराधीन उपमुख्यमंत्र्यांची माहिती

107

मागील काही दिवसांत लव्ह जिहाद आणि धर्मांतर याविरोधात बहुसंख्य समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत असतील, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मागील काही काळात महाराष्ट्रात आमिष दाखवून धर्मांतर झाल्याचे, तसेच लव्ह जिहादच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. वस्तुस्थितीचा अभ्यास करून याविषयीची कायदे आणण्यासाठी सरकार विचाराधीन आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

( हेही वाचा : IPL २०२३ चा नवा नियम! ‘इम्पॅक्ट प्लेअर’ गेमच बदलणार? जाणून घ्या… )

महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्रात कायदा करावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. यावरील चर्चेत सर्वपक्षीय आमदारांनी सहभाग घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शासनाची भूमिका सभागृहात स्पष्ट केली. ‘लव्ह जिहाद’ हा शब्द महाराष्ट्राने आणलेला नाही. सर्वोच्च न्यायालयातही याविषयी चर्चा झाली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी राज्यात ४० मोर्चे काढण्यात आले. यातून शासनाला याचे गांभीर्य समजले आहे. समाजाची भावना शासनाने लक्षात घेतली आहे. याविषयी विविध राज्यांत असलेल्या कायद्यांचा अभ्यास करून आपल्याकडे कशा प्रकारे कायदा केला पाहिजे, याचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

आमिष दाखवून धर्मांतर झाल्यास त्यासाठी भादंवि मधील ४२० (फसवणूक) नुसार गुन्हा नोंदवला जातो; परंतु भादंविमधील ४२० कलम धर्मांतरासाठी करण्यात आलेले नाही. अशावेळी विशेष कायदा करावा लागतो. धर्मांतराच्या घटना घडत आहेत. त्यामुले राज्यघटनेच्या चौकटीत राहून हा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा तयार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे या वेळी फडणवीस म्हणाले.

अंधश्रद्धा निमूर्लनाप्रमाणे कायदा व्हावा ! – आमदार गोपीचंद पडळकर

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जसा कायदा करण्यात आला, त्याप्रमाणे ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’ यासाठीही कायदा करण्यात यावा. ख्रिस्ती फादर थेट येशूशी बोलल्याचे दाखवून ‘कॅन्सर’ बरा करत असल्याचे सांगतात. यातून धर्मांतर केले जाते. ‘जिहाद’ हा अरबी शब्द. धर्मांध मुसलमान प्रेमाच्या नावाने हिंदु मुलींचे धर्मांतर करतात याला ‘लव्ह जिहाद’ म्हणतात. धर्मांधांचे हे षडयंत्र गावागावांत पोचले आहे.

धारावी, मानखुर्द, गोवंडी येथे लव्ह जिहादच्या घटना ! – आमदार प्रसाद लाड

‘इस्लाम रिसर्च फाऊंडेशन’ द्वारे झाकीर नाईक असे प्रकार करत असल्याचे उघड झाले आहे. केरळमध्येही ख्रिश्चन धर्मियांनीही लव्ह जिहादच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. केरळमध्ये हा विषय गांभीर्याने घेण्यात आला आहे. मुंबईतील धारावी, मानखुर्द, गोवंडी येथे १४-१८ वर्षे वयोगटातील मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवले जाते. ही कोणती प्रवृत्ती आहे ? यासाठी कोण रॅकेट चालवते ? याचा शोध घ्यायला हवा. .

लव्ह जिहादमध्ये युवतींना वशीकरण करण्यात येत आहे ! – आमदार प्रवीण दरेकर

बोरीवली अशोकवन येथील लव्ह जिहादमध्ये गायब झालेल्या मुलीचे वशीकरण करण्यात आले होते. त्याचा परिणाम भयानक आहे. पालघरमध्ये गरीबी, असाहाय्यता यांचा अपलाभ घेऊन ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत. याविषयी उपाययोजना काढायला हवी.

या वेळी भाजपच्या आमदार उमा खापरे म्हणाल्या, यासाठी परदेशातून पैसा येतो, कोणत्या संघटनेकडून पैसा पुरवला जातो ? ख्रिस्ती मिशनरींकडून धर्मांतराचे शिक्षण दिले जाते. याविषयी अन्वेषण करण्याची मागणी केली. यावर गृहमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार अनिल परब यांनी लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींची पालकांची भेट घडवून देण्याविषयी प्रयत्न करायला हवा, असे म्हटले. यावर फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना सांगून याविषयी कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल, असे सांगितले. उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पुणे जिल्ह्यात धर्मांतराच्या प्रचंड घटना होत आहेत. या धर्मांतराच्या घटना का होतात ? याची माहिती नोंदवण्याची पद्धत असायला हवी, असे म्हटले. याविषयी माहिती घेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.