भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात गुरुवारपासून मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्याद्वारे गाळाने आणि कचऱ्याने भरलेल्या नाल्यांची रेकी करण्यात येत असून भविष्यात या रेकीच्या आधारे भाजप प्रशासनावर न झालेल्या नालेसफाईच्या कामावरून हल्ला चढवताना दिसणार आहे.
( हेही वाचा : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा निघाला मनोरुग्ण! )
प्रशासन आणि कंत्राटदारांची तारांबळ
दर वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणारी नालेसफाईची कामे या वर्षी एप्रिलचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप सुरू झालेली नाहीत.काही ठिकाणी तुरळक काम सुरू झाली आहेत. भाजपाने सेवा सप्ताहच्या निमित्ताने मुंबईतील सर्व नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा आयोजित केला असून गुरुवारी सांताक्रुज,खार येथील गझधरबांध नाला येथून या दौऱ्याला सुरुवात झाली. भाजपाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आणि कंत्राटदारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला असून शुक्रवारी पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पूर्व, जुहू, वर्सोवा, गोरेगाव येथे पाहणी करण्यात आली. मोगरा नाला, गोरेगाव शास्त्रीनगर नाला, भगतसिंग नगर येथील नाला या प्रश्न या नाल्याची पाहणी करण्यात आली.
सध्याचे चित्र भयावह
सर्वच नाल्यांमध्ये प्रचंड गाळ तसाच पडून असून कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकच्या पिशव्या असे अत्यंत भयावह चित्र सध्या पाहायला मिळते आहे, अवघा दीड महिन्याचा कालावधी आता शिल्लक असून दीड महिन्यात ही साफसफाई होईल का ? या वर्षी दरवर्षीपेक्षा अधिक भयानक पूर परिस्थितीला मुंबईकरांना सामोरे जावे लागेल ? यावेळी सध्याचे चित्र भयावह असल्याची चिंता भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली. दरम्यान शनिवारी मुलुंड ते घाटकोपर दरम्यान दौरा करण्यात येणार आहे.
शुक्रवारी झालेल्या या नालेसफाईच्या दौऱ्यात आमदार अमित साटम, भाजपा माजी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, माजी पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, अनिश मकवाना, सुधा सिंग, रेणू हंसराज, योगिराज दाभाडकर, रंजना पाटील, हर्ष पटेल, संदीप पटेल, दीपक ठाकूर आदी स्थानिक माजी नगरसेवक व नगरसेविका सहभागी झाले होते.