मुंबईची तुंबई आता होणार नाही

107

मुंबईतील कुलाबा ते माहिम धारावी या शहर भागातील ९८ किलोमीटर लांब अंतराच्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची ‘सुव्यवस्थित स्वच्छता’ केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील ६३ किलोमीटर अंतराच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाची यशस्वी स्वच्छता करण्यात आल्याने लालबहादूर शास्त्री मार्ग, मिठी नदी पातमुख, कुर्ला व शीव रेल्वे स्थानक परिसरांना दिलासा मिळाला होता. या सर्व परिसरांमध्ये जोरदार पावसाप्रसंगी पाण्याचा निचरा वेगाने झाला. त्यामुळे झोपडपट्टी बहुल वस्त्यांना दिलासा मिळाला. एवढेच नव्हे तर, शीव (सायन) व कुर्ला रेल्वे स्थानकांमध्ये रुळांवर पाणी साचले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामांमुळे मुंबईची तुंबई आता होणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांचे परिरक्षण व दुरुस्तीविषयक कामे पर्जन्य जलवाहिन्या प्रचालने व परिक्षण उपविभागामार्फत करण्यात येते. संपूर्ण मुंबई शहर व उपनगरे मिळून सुमारे ३ हजार ५०० किलोमीटर लांब अंतराचे पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे आहे. यामध्ये लहान-मोठ्या वाहिन्या, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या वाहिन्या, खुल्या व बंदिस्त, भूमिगत अशा सर्व प्रकारच्या आणि कमानी (आर्च), बॉक्स (कपाट), पाईप (गोल) अशा वेगवेगळ्या आकाराच्या वाहिन्याही आहेत. त्यासोबत यातील काही वाहिन्या या ब्रिटिशकालीन अशा १०० वर्षांहून अधिक जुन्या असून त्या प्रामुख्याने शहर विभागात आहेत. स्वाभाविकच, या वेगवेगळ्या प्रकाराच्या पर्जन्य जलवाहिन्यांची देखभाल, दुरुस्ती ही तितकीच वैविध्यपूर्ण पद्धतीने करावी लागते आणि ती आव्हानात्मक असते.

पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेचे आव्हान

पावसाळी पाण्याचा त्वरेने निचरा होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची नियमितपणे स्वच्छता व दुरुस्ती करावी लागते. बंदिस्त व भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये शिरण्याची जागा अर्थात मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) व त्याच्या दोन्ही बाजूस एक मीटर अंतरापर्यंत महानगरपालिकेकडून नियमित देखभाल (परिरक्षण), दुरुस्ती व स्वच्छता नियमितपणे केली जाते. दोन मॅनहोल मधील अंतर सुमारे ३० मीटर इतके असते आणि इतके अंतर निव्वळ मनुष्यबळाच्या सहाय्याने देखभाल करणे शक्य होत नाही. कारण अशा वाहिन्यांच्या आतमध्ये अंधार, विषारी स्वरुपाचे वायू, प्राणवायूचा अभाव, साचलेला कोरडा गाळ असे वेगवेगळे धोके असतात. या सर्व आव्हानांना पार करु शकेल, इतकी आधुनिक यंत्रणा व तज्ज्ञ, कुशल मनुष्यबळ महानगरपालिकेकडे उपलब्ध नसते. महानगरपालिकेकडून सक्शन व जेटिंग पद्धतीने लहान आकाराच्या वाहिन्या स्वच्छ केल्या जातात. मात्र मोठ्या आकाराच्या व आव्हानात्मक असणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सक्शन व जेटिंग परिणामकारक ठरत नाही. परिणामी गाळ साचून पर्यायाने वहन क्षमता कमी होवू शकते. त्यामुळे अशा मोठ्या वाहिन्यांची देखभाल, दुरुस्ती विशेष कामांच्या स्वरुपात करावी लागते. त्यासाठी ‘सुव्यवस्थित स्वच्छता’ (systematic cleaning) पद्धतीचा अवलंब केला जातो.

अशी असते ‘सुव्यवस्थित स्वच्छता’

सुव्यवस्थित स्वच्छता करताना बंदिस्त व भूमिगत वाहिन्यांमधील गाळ, कचरा हा पाईपच्या सहाय्याने शोषून बाहेर काढला जातो, त्याचवेळी पाण्याचा मारा करुन वाहिन्यांची स्वच्छताही केली जाते. वाहिन्यांमधील विषारी वायू मशीनच्या सहाय्याने बाहेर काढले जातात. त्यानंतर स्वच्छ झालेल्या वाहिन्यांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने निरीक्षण केले जाते. आवश्यक असल्यास, त्या जागी योग्य दुरुस्ती व देखभालीची कामे केली जातात. सुव्यवस्थित स्वच्छतेनंतर या वाहिन्यांची प्रवाह क्षमता पूर्ववत होण्यास मदत होते, त्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होतो.

शहर विभागातील सुव्यवस्थित स्वच्छतेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबईतील एकूण पर्जन्य जलवाहिन्यांपैकी, शहर विभागात सुमारे ५८२ किलोमीटर लांब अंतराच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे आहे. यामध्ये सध्या ब्रिटिशकालीन अशा १०० वर्षांहून अधिक जुन्या कालावधीच्या ५८ किलोमीटर अंतराच्या वाहिन्या आहेत. ब्रिटिशकालीन व त्यानंतरच्या अशा दोन्ही कालावधीतील मिळून सुमारे ६३ किलोमीटर लांबीच्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची सुव्यवस्थित स्वच्छता महानगरपालिकेने यापूर्वी केली आणि ती यशस्वी देखील ठरली. पहिल्या टप्प्यातील या ६३ किलोमीटर अंतराच्या सुव्यवस्थित स्वच्छतेमुळे गांधी मार्केट, शीव (सायन), हिंदमाता आणि शहरातील बहुतांश परिसरांना पावसाळी पाणी तुंबण्याच्या समस्येतून दिलासा मिळाला.

मागील वर्षी करण्यात आलेल्या सुव्यवस्थित स्वछतेमुळे लालबहादूर शास्त्री मार्ग, मिठी नदी पातमुख, कुर्ला व शीव रेल्वे स्थानक परिसरांना दिलासा मिळाला. या सर्व परिसरांमध्ये जोरदार पावसाप्रसंगी पाण्याचा निचरा वेगाने झाला. त्यातून झोपडपट्टी बहुल वस्त्यांना दिलासा मिळाला. एवढेच नव्हे तर, शीव (सायन) व कुर्ला रेल्वे स्थानकांमध्ये रुळांवर पाणी साचले नाही, पर्यायाने उपनगरीय रेल्वे सेवा पावसातही सुरळीत सुरु होती. त्याचा रेल्वे प्रवास प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. ही सर्व यशस्वी कामगिरी पाहता, आता महानगरपालिकेने शहर विभागात दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ किलोमीटर अंतराच्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची सुव्यवस्थित स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रिया पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या प्रचालने व परीरक्षण उपविभागाने सुरु केली आहे.

शहर विभागातील एवढ्या किलो मीटरची होणार स्वच्छता

  • ए विभाग ७.५५० किलोमीटर
  • बी विभाग ११ किलोमीटर
  • सी विभाग ४.१९८ किलोमीटर
  • डी विभाग १४.६७९ किलोमीटर
  • इ विभाग १५.२८३ किलोमीटर
  • एफ दक्षिण विभाग ६.७२३ किलोमीटर
  • एफ उत्तर विभाग १३.५६७ किलोमीटर
  • जी दक्षिण विभाग १२.१४५ किलोमीटर
  • जी उत्तर विभाग १२.५५३ किलोमीटर

(हेही वाचा – तांत्रिक सल्लागाराचे आडाखे चुकले; माहीम पादचारी पुलाचा खर्च लाखांनी वाढला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.