Mhada : म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी संजीव जयस्वाल, डिग्गीकर यांची बदली

संजीव जयस्वाल यांनी कोविड काळात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) विभागाचा पदभार सांभाळला होता.

187

म्हाडाच्या उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांची बदली झाली असून या रिक्त जागी संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांनी यापूर्वी ठाणे महापालिका आयुक्तपद तसेच मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपद भुषवले आहे. त्यामुळे संजीव जयस्वाल हे म्हाडाच्या कारभारात गती आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९९०च्या तुकडीतील अनिल डिग्गीकर यांची ११ सप्टेंबर २०२० रोजी म्हाडा उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली  होती. कोविड कालावधीत म्हाडाची सुत्रे हाती घेणाऱ्या डिग्गीकर यांनी कोविडनंतर म्हाडाच्या मुंबई व कोंकण मंडळाच्यावतीने घरांच्या लॉटरी काढून सर्वसाधारण जनतेला घरांची उपलब्धता करून दिली होती. तसेच म्हाडाच्या कारभारालाही काही प्रमाणात गती आणण्याचे काम केले होते. मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) म्हणून केलेल्या कामांच्या अनुभवाच्या जोरावर म्हाडाचा कारभार सुरळीत हाकणाऱ्या डिग्गीकर यांची सेवेच्या तीन वर्षांनंतर बदली करण्यात आली आहे.

(हेही वाचा BMC : महापालिकेचे आशिष शर्मा यांची बदली; डॉ. सुधाकर शिंदे हे नवीन अतिरिक्त आयुक्त)

या रिक्त जागी पाणी पुरवठा विभागात कार्यरत असणाऱ्या १९९७च्या तुकडीतील संजीव जयस्वाल यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांनी कोविड काळात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) विभागाचा पदभार सांभाळला होता. जयस्वाल यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेला बऱ्याच वर्षांनी आक्रमक अधिकारी प्राप्त झाले होते. परंतु अवघ्या काही महिन्यांतच जयस्वाल यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर जयस्वाल यांची दोन ते तीन वेळा बदली झाली असून आता म्हाडाच्या उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची नियुक्ती झाल्याने म्हाडाला सकारात्मक काम करणारे आणि आक्रमक वृत्तीचे अधिकारी लाभले असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.