Repo Rate : २०२५ पर्यंत रेपो दरात कपातीची शक्यता नाहीच

Repo Rate : महागाई दर ९ महिन्यातील उच्चांकावर आहे.

146
Repo Rate : २०२५ पर्यंत रेपो दरात कपातीची शक्यता नाहीच
  • ऋजुता लुकतुके

देशातील किरकोळ महागाई दर सप्टेंबर महिन्यात गेल्या ९ महिन्यातील उच्चांकावर पोहोचला आहे. देशाचा वार्षिक महागाई दर सप्टेंबर महिन्यात ५.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मध्यवर्ती बँकेनं महागाई दर २ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचं उद्दिष्टं ठरवलेलं असताना महागाई मात्र वाढतच आहे. त्यामुळेच रेपो दर (Repo Rate) कपातीची चर्चा सुरू असताना अचानक ही नकारात्मक बातमी आली आहे. ऑक्टोबर महिन्यातच रिझर्व्ह बँकेनं रेपोदर कपातीकडे आपली वाटचाल सुरू असल्याचं म्हटलं होतं. तेव्हा महागाई दराचा अंदाज होता ४.५ टक्क्यांचा.

पण, दोनच आठवड्यात चित्र पालटलं आहे. सप्टेंबर महिन्याचे महागाईचे आकडे मोठी वाढ दर्शवतात. त्याचा फटका बसणार आहे. ७ तारखेला झालेल्या पतधोरणाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेनं रेपो दर (Repo Rate) जैसे थे ठेवले. पण, महागाई आटोक्यात येत असल्याचं निरीक्षण मांडलं होतं. डिसेंबर २०२४ पासून कदाचित रेपो दर कमी होतील, असाही अंदाज व्यक्त केला होता.

(हेही वाचा – मशिदीत जय श्रीराम म्हटल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत; Karnataka High Court चा निर्वाळा)

अनियमित पावसामुळे फळं आणि भाज्यांबरोबरच डाळी महागल्या आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. रेपो दर हे महागाई आटोक्यात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या हातात असलेलं हत्यार आहे. रेपो दर (Repo Rate) वाढला की, कर्ज महाग होतात. त्यामुळे लोक कमी प्रमाणात कर्ज घेतात. त्यामुळे लोकांच्या हातात कमी पैसा राहतो आणि त्यांच्याकडून मागणी घटते. मागणीच कमी झाल्यावर अर्थातच दरही आटोक्यात येतात आणि याचा थेट परिणाम महागाई दर कमी होण्यात होतो.

कोरोना नंतरच्या काळात महागाई दर आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेनं रेपो दर (Repo Rate) वाढवण्याचं धोरण ठेवलं. गेल्या १० पतधोरणांमध्ये त्यांनी रेपो दर जैसे थे ठेवले आहेत. आता हळूहळू व्याजदर कपातीला सुरुवात होईल अशी आशा होती. पण, ती आता फोल ठरली आहे. नवीन आर्थिक वर्षांत म्हणजेच २०२५-२६ मध्ये मात्र दरकपात होऊ शकते. ‘पाऊस चांगला झालाय. जलसाठे भरलेले आहेत आणि रब्बी पीकं चांगली येतील असं दिसतंय. तसं झालं तर २०२५ च्या सुरुवातीला रेपो दरातही कपात होऊ शकते. जेव्हा महागाई दर ४ ते ४.५ टक्क्यांवर नियमितपणे येईल तेव्हा दर कपातीचा विचार करता येईल,’ असं कोटक महिंद्रा बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ उपासना भारद्वाज यांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.