BMC : मुंबईसाठी १२ हजार मोठ्या आकाराच्या कचरापेट्यांची खरेदी; पण ४०० रुपये अधिक मोजून

एक ते दीड वर्षांपूर्वी दोन हजार रुपयांना खरेदी केलेल्या या कचरापेट्या आता २,४६६ रुपयांना खरेदी केल्या जात आहेत.

135
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईत निर्माण होणारा कचरा एकाच ठिकाणी जमा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने २४० लिटर क्षमतेच्या मोठ्या आकाराच्या कचरापेट्या सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आल्या आहे. परंतु यापैकी बहुतांशी कचरापेट्या तुटल्या, तसेच खराब झाल्याने आता महापालिकेच्यावतीने नव्याने मोठ्या आकाराच्या कचरापेट्यांची खरेदी केली जात आहे. यासाठी तब्बल १२,००० कचरापेट्या खरेदी केल्या जात असून एक वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या या कचरापेट्यांच्या किंमतीत सुमारे ४०० रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे एक ते दीड वर्षांपूर्वी दोन हजार रुपयांना खरेदी केलेल्या या कचरापेट्या आता २,४६६ रुपयांना खरेदी केल्या जात आहेत. विशेष म्हणजे या कचरापेट्या उत्पादक कंपन्यांकडून खरेदी करूनही मागील वर्षांच्या तुलनेत महापालिकेने प्रत्येक कचरा पेटी मागे ४०० रुपये अधिक मोजून याची खरेदी करण्याचा घाट घातला आहे.

मुंबईत मागील काही वर्षांपासून २४० लिटर क्षमतेच्या कचरापेट्यांची कमतरता असून नगरसेवक निधीतून देण्यात येणाऱ्या १२० लिटर आणि २४० लिटर क्षमतेच्या कचरापेट्यांची खरेदी बंद करण्यात आल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाला याची खरेदी करून सोसायटीसह इतर भागांमध्ये याचा मोठ्या आकाराच्या कचरापेट्यांचा पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे सन २०२१- २२मध्ये महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने २४० लिटर क्षमतेची एक कचरा पेटी २०५६ रुपये दराने खरेदी केला होता.

(हेही वाचा BMC : परळ टीटी उड्डाणपुलावरून दुचाकी आणि अवजड वाहनांना नो एंट्री; येत्या १ जूनपासून फक्त हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश)

परंतु या कचरापेट्यांचा साठा संपुष्टात आल्याने आता १२ हजार कचरापेट्यांची खरेदी केली जात आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये निलकमल लिमिटेड, ऍरिस्ट्रोप्लास्ट प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विमप्लास्ट या तीन उत्पादक कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये निलकमल कंपनीने प्रति नग २४६६ रुपये दराने या कचरापेट्या देऊ केल्या असून यासाठी २ कोटी ९५ लाख ९२ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेने  २०२१-२२मध्ये २४० लिटर क्षमतेची कचरा पेटी २०५६ रुपयांमध्ये खरेदी केली होती, परंतु त्याच प्रकारची कचरापेटी आता २,४६६ रुपयांमध्ये खरेदी केली जाणार आहे. विशेष म्हणजे उत्पादक कंपन्यांकडून खरेदी करताना एवढी रक्कम वाढत असल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेने निविदा काढताना कुठेही एका पेटीची अंदाजित रक्कम जाहीर केली नव्हती. त्यामुळे उत्पादकांनी ज्या किंमतीत देऊ केली आहे, त्याच किंमतीमध्ये खरेदी केली जात आहे. यापूर्वी १२० लिटर क्षमतेच्या कचरापेट्या या वितरकांकडून १,८८० रुपयंमध्ये खरेदी केल्या होत्या, त्यानंतर उत्पादक कंपन्यांकडून या कचरापेट्या खरेदी करताना ऍरिस्ट्रोप्लास्ट कंपनीने या क्षमतेची कचरा पेटी १,५७६ रुपयांना दिली होती. त्यामुळे २४० लिटर क्षमतेच्या कचरापेट्या उत्पादक कंपन्यांकडून खरेदी करताना ही रक्कम कमी होणे अपेक्षित असताना महापालिकेचे अधिकारी केवळ डोळे बंद करून महापालिकेची तिजोरी लुटण्याचे काम करत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या दरात या कचरापेट्या खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची वाटाघाटी न झाल्याने  अधिकचा पैसा या कचरा पेट्यांसाठी खर्च केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.