MSRTC च्या ताफ्यात आतापर्यंत केवळ ६५ ई-बसगाड्या दाखल; दिरंगाईमुळे कंत्राट रद्द करण्याची मागणी

आतापर्यंत ताफ्यात दाखल झालेल्या ई-बसची संख्या एसटीच्या (MSRTC)  ठाणे विभागात २४, नाशिक विभाग १०, नागपूर विभाग २६, सातारा विभाग ५ इतकी असून  महामंडळाची प्रवासी संख्या कमालीची वाढली असून गाड्या कमी पडत आहेत. 

90
एसटी महामंडळाने (MSRTC) ५ हजार १५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार एका कंपनीशी केला. ही कंपनी दर महिन्याला २१५ बसेस देणार होती. 13 फेब्रुवारी २०२४ रोजी या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. परंतु मार्च ते ऑगस्ट २०२४ या महिन्यात पुरवठादार कंपनीकडून एसटीला केवळ ६५ ई-बसगाड्या मिळाल्या. कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात यावे. या गाड्या या पुढे सुद्धा वेळेवर येतील अशी खात्री नसल्याने भाडे तत्वावरील गाड्या न घेता स्व मालकीच्या नवीन गाड्या खरेदी कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली.

ई-बस कंपनीला प्रती बस २० लाख रुपये इतकी सबसीडी 

आतापर्यंत ताफ्यात दाखल झालेल्या ई-बसची संख्या एसटीच्या (MSRTC)  ठाणे विभागात २४, नाशिक विभाग १०, नागपूर विभाग २६, सातारा विभाग ५ इतकी असून  महामंडळाची प्रवासी संख्या कमालीची वाढली असून गाड्या कमी पडत आहेत. त्याच प्रमाणे ई-बस कंपनीला प्रती बस २० लाख रुपये इतकी सबसीडी सरकार देणार असून ६५० कोटी रुपये चार्जिंग सेंटरसाठी खर्च होणार आहेत. एकूण १७२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी काही चार्जिंग सेंटर पूर्ण झाली आहेत. महावितरण कंपनीला १०० कोटी रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यात आली आहे. त्याच प्रमाणे रस्ता खोदणे व पूर्ववत करण्यासाठी महापालिका, नगर परिषदा व नगर पालिकाना २० ते २५ कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. चार्जिंग स्टेशनवर ३९० कोटी रुपये खर्च करण्यात येत असून ९० कोटी बांधकामावर खर्च करण्यात आले आहेत. गाड्या वेळेवर न आल्याने सरकारच्या पैशाचा नाहक अपव्यय होत असून जोपर्यंत निश्चित केलेल्या वेळेत गाड्या येत नाहीत. तोपर्यंत चार्जिंग स्टेशनसाठी गुंतवलेल्या रक्कमेचे व्याज रक्कम कंत्राटदार कंपनीकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. (MSRTC)
एकंदर सर्व परिस्थिती पाहता एसटी (MSRTC) कडे प्रवाशांसाठी गाड्या कमी पडत असून त्यांची गैरसोय होत आहे. या सर्व प्रकाराला गाड्या पुरवणारी कंपनी कारणीभूत असून या कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच एसटीने यापुढे भाडे तत्वावरील गाड्या न घेता  स्व मालकीच्या नवीन गाड्या खरेदी कराव्यात व त्यासाठी सरकारने निधी प्राप्त करून द्यावा, अशी मागणीही श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.