आता पहाटे पाच वाजताच उघडणार उद्यान, मैदानांची दारे…

116
मुंबईतील महानगरपालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने ही नागरिकांसाठी खुली ठेवण्याची वेळ वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.  या निर्णयाअंतर्गत दर सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत (एकूण १५ तास) नागरिकांना उद्याने व मैदाने खुली राहतील. तर आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार व रविवारी त्याचप्रमाणे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत अर्थात सलग १७ तास खुली ठेवली जाणार आहे. ज्याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
2 2
खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने यांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच ही उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने यांचा अधिकाधिक नागरिकांना व जास्तीत-जास्त वापर करता यावा, यासाठी उद्याने व मैदानांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेची उद्याने व मैदाने ही सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत वापरासाठी खुली असतात. परंतु, उद्याने व मैदानांमध्ये येणाऱ्या अबालवृद्धांची संख्या लक्षात घेता, विशेषतः कोविड संसर्ग कालावधीनंतर सुदृढ आरोग्यासाठी जागरुक नागरिकांची वाढलेली संख्या लक्षात घेता दिवसातील जास्तीत-जास्त वेळ उद्याने व मैदाने नागरिकांना वापरासाठी खुली असावीत, असा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार उद्यान विभागाने घेतला असल्याची माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
3 1
मुंबईत एकूण २२९ उद्याने, ४३२ मनोरंजन मैदाने, ३१८ खेळाची मैदाने, २६ पार्क आहेत. या सर्व ठिकाणच्या वेळा वाढवल्याने सर्व मुंबईकरांना त्याचा मोठा फायदा होईल असा विश्वास  उद्यान अधीक्षक  जितेंद्र परदेशी यांनी यांनी व्यक्त केला आहे. वाढीव वेळेच्या अनुषंगाने, या निर्णयासंदर्भात महानगरपालिकेने सुधारित परिपत्रक जारी केले असून त्याअंतर्गत सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने ही सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली असतील. त्याचप्रमाणे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली असतील, असे नमूद केले आहे.
 विशिष्ट उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदान खुली ठेवण्याच्या वेळेत काही बदल करावयाचा असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त न्याय्य कारणास्तव संबंधित अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने बदल करु शकतील.हे परिपत्रक प्रसारित झाल्याच्या दिनांकापासून उद्यानांच्या वेळेबाबत यापूर्वीची  सर्व परिपत्रके रद्द होतील. उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदाने नागरिकांना खुली असण्याच्या वेळेतील बदल दर्शविणारे फलक उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदाने यांच्या दर्शनी भागावर लावण्यात येतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.