आता MSRTC च्या शिवनेरीमध्ये दिसणार ‘सुंदरी’

134
मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीमध्ये दिली.

बैठकीत 70 पेक्षा अधिक विषयांवर चर्चा 

एसटी महामंडळाचे (MSRTC) नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका  नेमण्यास मान्यता देण्यात आली. याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा देणे अपेक्षित आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे (MSRTC) नवे आगार निर्माण करण्यात येणार असून, या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे. वरील निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना  या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.