Mahayuti : दादांना बाहेरचा रस्ता राणेच दाखवणार!

1357
Mahayuti : दादांना बाहेरचा रस्ता राणेच दाखवणार!
Mahayuti : दादांना बाहेरचा रस्ता राणेच दाखवणार!

सचिन धानजी

राज्यात महायुतीत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) आणि पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Devendra Fadanvis) हे समाधानी आहेत का? ते महायुतीतून बाहेर पडतील का? भाजपा त्यांना महायुतीतून बाहेर जायला लावते का, असे एक ना अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. त्यावर चर्वाचर्वण सुरु आहे. अजित पवार हे महायुतीत खुश आहेत किंवा नाही हे जरी सांगता येत नसले तरी लग्न होऊन आल्यानंतर ज्याप्रकारे सुनेला सासरच्यांकडून जाच होऊनही केवळ आपला संसार टिकवण्यासाठी सर्व सहन करावं लागतं, तसंच काहीसं शोषित सुनेप्रमाणं अजित पवार (DCM Ajit Pawar) सहन करत असावेत.

मुळात महायुतीत शिवसेना आणि भाजपाचं चांगलं चाललेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपात अजित पवारांना सत्तेत घेऊन भाजपानं स्वत:ची वाट लावली, असं जे म्हणतात ते त्यांच्या जागी योग्य असले तरी लोकसभा निवडणुकीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागून टाकण्याची कुठे तरी ही रणनिती होती. त्यात भाजपाची ही रणनिती योग्य ठरली, फळाला आली असं कुठेच दिसून आलं नाही. त्यामुळे पवारांना महायुतीत घेऊन भाजपाचा काहीच फायदा झाला नाही, उलट भाजपाचं नुकसान झालेलं आहे. ते कसं तर ज्या दिवशी शरद पवारांची साथ सोडून आमदारांसमवेत अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले, त्याच दिवसापासून भाजपाच्या मतदारांनी भाजपाकडे पाठ फिरवली. भाजपाच्या लोकप्रतिनिधींची भेट घेऊन भाजपाच्या मतदारांनी आता तुम्ही आमच्याकडे मत मागायला येवू नका असं सक्त बजावलं. एवढंच काय लोकसभेच्या प्रचारात लोकांच्या दारात गेल्यानंतर अजित पवारांना का घेतलं सोबत, आता आम्ही मतदान करणार नाही असं सांगून मतदान करण्यास स्पष्ट नकार दिला गेला होता. हीच मानसिकता आजही मतदारांची आहे. लोकसभेत मुस्लिम आणि दलित मतांनी भाजपाचा पराभव केला असं नाही तर भाजपाची पक्के मतदारही अजित पवारांना सोबत घेतल्याने लांब गेले.

(हेही वाचा – Hassan Nasrallah च्या हत्येवर मेहबूबा मुफ्तींचे मगरीचे अश्रू; निवडणूक रणनीती की दु:ख?)

अजित पवारांचा नितेश राणेंना विरोध

मुळात महायुतीचा मुख्य पाया हा हिंदुत्वावर रचला गेला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आमदार आणि खासदारांसह बाजूला झाले ते केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर. शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेने हिंदुत्व दावणीला बांधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेत बंड झाला. शिवसेना भाजपा महायुती ही हिंदुत्वाच्या मजबूत दोराने बांधली गेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी महायुतीत सहभागी झाल्यानंतर हिंदुत्व स्वीकारलं असलं तरी लोकसभेनंतर मात्र ते हिंदुत्वाच्या मार्गावर जायला तयार नाहीत. भाजपाचे आमदार नितेश राणे हे कायम हिंदुत्वाचा झेंडा फडकवण्यासाठी मुस्लिमांच्या धर्मांधपणावर आक्षेप घेत आहेत. मोर्चे आणि आंदोलन करत आहेत. परंतु याला आता उघड उघड अजित पवार हे विरोध करताना दिसत आहेत. नितेश राणे यांच्या विधानांचा समाचार घेऊन अजित पवार यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत असून भाजपाच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी अशाप्रकारे जाहीर पत्रकार परिषद तसेच सभांमधून सांगत आहेत. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अजित पवारांनी भाजपाच्या हायकमांडकडे नितेश राणे यांच्या आक्रमक भाषणांबाबत तक्रार केली. मागील काही दिवसांपासून नितेश राणे, संजय गायकवाड आणि अनिल बोंडे हे आक्रमक बोलत आहेत. पण अजित पवारांचा सर्वाधिक आक्षेप हा नितेश राणेंच्या वक्तव्यांबाबत आहे.

महायुतीच्या नेत्यांना सूचना

हिंदू जनआक्रोश मोर्च्यातून (Hindu Janakrosh Morcha) नितेश राणे यांनी हिंदुत्व मांडत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच नितेश राणे हे सातत्याने हिंदुंच्या सभा घेऊन तसेच जनआक्रोश मेळावे काढून हिंदुंची ताकद दाखवण्याचे काम करत आहेत. धारावीतील घटना असो वा मिरा रोड किंवा साधू महंतांना मारण्याची धमकी देण्याचा प्रयत्न असो, अशा घटनांमुळे हिंदुंची ताकद दाखवण्याची गरज आहे आणि महायुतीचा अजेंडा हा नितेश राणे राबवत आहेत. परंतु आता महायुतीतील घटक पक्षाकडूनच नितेश राणे यांच्या वक्तव्याला विरोध होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार हे अॅक्शन मोडवर आलेले असून ते जनसन्मान यात्रा काढून पक्षाची बांधणी करत आहेत. यावेळी आळंदी येथील जाहीर कार्यक्रमात अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांनाच दणका दिला. कुणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये अशा सूचना त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या. अजित पवारांनी, धर्मांमध्ये, समाजामध्ये तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला.

(हेही वाचा – Gayatri Mandir च्या जागेवर मशीद; VHP आक्रमक, कारवाई न झाल्यास करणार कारसेवा)

निवडणूक जाहीर होताच अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार

नितेश राणे हे काही आक्रमक हिंदुत्व सोडून आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत आणि अजित पवार यांना हे वातावरण मान्य नसल्याने भविष्यात ते महायुतीतून बाहेर पडतील. परंतु याला कारण नितेश राणे हेच असतील. परंतु हिंदुत्व हा महायुतीचा प्राणवायू आहे. त्यामुळे एकवेळ पवार सोडून गेलेले चालतील, पण हिंदुत्व हे शिवसेना भाजपा कदापि सोडणार नाही. त्यामुळे दादांना बाहेरचा रस्ता हा केवळ राणेच दाखवू शकतात, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण अजितदादांनी, नितेश राणे यांच्या विरोधात भाजपाच्या हायकमांडकडे तक्रार केल्यानंतरही राणे काही घाबरले नाही, उलट ते अधिक आक्रमक झाले आहेत. अजित पवारांना कुठे तक्रार करायची ती करू द्या असं सांगत त्यांनी आपले कार्य पुढे चालूच राहणार असल्याचं सांगितलं. हिंदुत्व मुद्दाच मान्य होत नसल्याने आधीच पक्षात घुसमट होत असल्याने तसेच पक्षातील सहकाऱ्यांकडून बाहेर पडण्याची विनंती केली जात असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील असे बोलले जात आहे, ते प्रत्यक्षात बाहेर पडलेले दिसतील. तसं झाल्यास भाजपाला अजित पवारांना बाहेर काढण्याचे स्वप्न पूर्ण होईल. परंतु ज्या भाजपाने अजितदादांना आपल्यासोबत घेतलंय, ते त्यांना एकटे सोडणार नाही. ते स्वतंत्र लढले किंवा तिसऱ्या आघाडीत लढले तरी त्यांची काळजी भाजपाकडून घेतली जाणार नाही असं होणार नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.