Maharashtra Assembly 2024: दिव्यांग मतदारांची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था

78
Maharashtra Assembly 2024: दिव्यांग मतदारांची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था
Maharashtra Assembly 2024: दिव्यांग मतदारांची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई
 मुंबईतील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आणि प्रत्येक केंद्रावर ‘व्हीलचेअर’ तसेच मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासंदर्भात  महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा संनियंत्रण समितीची (सुगम्य निवडणुका) महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी बैठक पार पडली.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशांन्वये आयोजित या बैठकीस अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त  आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर,  उप आयुक्त (शिक्षण) तथा संचालक (नियोजन)  प्राची जांभेकर, जिल्हा संनियंत्रण समितीचे (सुगम्य निवडणुका) सदस्य सचिव आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण तथा जिल्हा दिव्यांग समन्वय अधिकारी प्रसाद खैरनार यांच्यासह समितीतील अन्य सदस्य, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Assembly 2024)
एकूण २३ हजार ९२७ दिव्यांग मतदार..
मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण १७ हजार ५४० आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ६ हजार ३८७ असे मिळून एकूण २३ हजार ९२७ दिव्यांग मतदार आहेत. या सर्व दिव्यांग मतदारांना अत्यंत सुलभरित्या आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय मतदान करता यावे, यासाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. या अंतर्गत दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरुन संबंधित मतदान केंद्रावर सहज व सुलभतेने येऊन मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघांमध्ये स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी ६१३ वाहतूक व्यवस्थेची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या ठिकाणांवर एकूण ९२७ वाहने नेमण्यात आली आहेत. (Maharashtra Assembly 2024)
वाहनांची ३५ ‘रिंग रुट’ आणि ‘शटल रुट’वर सेवा
मुंबई शहर जिल्ह्यात दिव्यांग मतदारांसाठी ६७१ वाहतूक व्यवस्थेची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या ठिकाणांवर एकूण ७० वाहने नेमण्यात आली आहेत. ही वाहने ३५ ‘रिंग रुट’ आणि ‘शटल रुट’वर सेवा देतील. यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी सुलभ असलेल्या बसेस, रिक्षा आणि इकोव्हॅनचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजे बुधवार,  २० नोव्हेंबर २०२४ रोजी ही वाहने या मार्गांवरून धावतील. (Maharashtra Assembly 2024)
एकूण २ हजार ५४९ ‘व्हीलचेअर’ ..
मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान करताना दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी  २ हजार ०८५ मतदान केंद्रांच्या ठिकाणी आणि एकूण २ हजार ५४९ ‘व्हीलचेअर’ उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या ‘व्हीलचेअर’वरुन दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राच्या आत ने-आण करण्यासाठी तसेच अन्य मदतीसाठी एकूण २ हजार ०८५ दिव्यांग मित्र तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच उपनगर आणि शहरातील एकूण ७ मतदानाच्या ठिकाणी जिन्यावर सरकत्या ‘व्हीलचेअर’ची देखील (स्टेअर क्लायबिंग व्हीलचेअर) व्यवस्था करण्यात आली आहे. (Maharashtra Assembly 2024)
मतदारसंघ स्तरावर समन्वयक अधिकारी..
या सुविधांचा लाभ प्रत्येक दिव्यांग मतदारांना घेता येईल. तसेच या सुविधा सुनिश्चित करण्यासाठी आणि दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ स्तरावर समन्वयक अधिकारी (दिव्यांग मतदार) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, अधिक मदतीसाठी संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी किंवा १०९५ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क करुनही माहिती घेता येईल. (Maharashtra Assembly 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.