पीओपीच्या मूर्तींपासून होणारे जलप्रदूषण रोखणारा अभिनव प्रयोग

भविष्यात या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात होणारे नदी प्रदूषण टाळण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

20
पीओपीच्या मूर्तींपासून होणारे जलप्रदूषण रोखणारा अभिनव प्रयोग
पीओपीच्या मूर्तींपासून होणारे जलप्रदूषण रोखणारा अभिनव प्रयोग
  • नमिता वारणकर 

पारंपरिक शाडूच्या मूर्तींऐवजी हल्ली पीओपींच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांचा वापर सर्रास केला जातो. पीओपीची मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाही. यामुळे या मूर्तींचे अवशेष पाण्यात तरंगतात. यामुळे जलप्रदूषण होते. पर्यावरणाचा होणारा हा ऱ्हास टाळण्यासाठी पुण्यातील चिखली येथील श्री दादा महाराज नाटेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपासून खत आणि फक्की तयार करण्याचा अभिनव प्रयोग केला.

या प्रयोगाविषयी शाळेच्या संचालिका प्रज्ञा पिसोळकर यांनी सांगितले की, आमची शाळा पर्यावरणस्नेही असल्याने दरवर्षी शाळेत विविध प्रयोग राबवले जातात. गेल्या वर्षी निर्माल्य संकलन, प्लास्टिक संकलन, इको ब्रिक्स प्रकल्प असे विविध उपक्रम आम्ही राबवले. यावर्षी पीओपीच्या गणेश मूर्तींचे पर्यायवरणपूरक विघटन करण्याचा प्रकल्प सादर केला. पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस. हे रसायन पाण्यात विरघळत नाही. धर्मशास्त्रानुसार, आपल्याकडे वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित करायची असते. या मूर्तींमुळे नदी प्रदूषित होते. पाण्यात रासायनिक रंग मिसळल्यामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. या मूर्ती तयार करायला सोप्या असतात. साच्यात घातल्या की, मूर्ती सहज बनवता येतात. शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा या मूर्ती स्वस्त असतात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये गणपतीची मूर्ती नदीतल्या मातीची असावी असा संकेत आहे. त्याचप्रमाणे मूर्ती ही आठ ते दहा इंचाची असावी, असेही सांगितलेले आहे. हल्ली इतकी लहान मूर्ती क्वचितच तयार होते तसेच दिखाऊपणा आणि मूर्तीची सजावट जितकी जास्त तेवढी प्रतिष्ठा मिळते, लोकांच्या अशा कल्पनेमुळे प्रदूषणही तितक्याच मोठ्या प्रमाणात होत आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने पीओपीच्या मूर्तीचं विघटन तयार करायचं ठरवलं.

या प्रयोगाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी त्या म्हणाल्या की, अविघटनशील पीओपीचे रुपांतर फक्की आणि खतामध्ये श्री दादा महाराज नाटेकर शाळेतर्फे केले गेले. यामुळे जलप्रदूषण थांबवायला मदत होईल, याची आम्हाला खात्री आहे. उपक्रम राबवण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती केली की, त्यांनी पीओपीच्या मूर्ती नदीत विसर्जन न करता शाळेला देणगी म्हणून द्याव्यात. काही पालकांनी या विनंतीला चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी मूर्ती शाळेत आणून दिल्या. महापालिकेकडून बऱ्याच मूर्ती शाळेला देण्यात आल्या.

Photo courtesy@Google 2

शाळेने जलप्रदूषण टाळण्यासाठी सुरू केलेल्या या समाजपयोगी प्रयोगाची इतरांना माहिती व्हावी, प्रयोगाचा प्रसार व्हावा यासाठी काय करता या प्रश्नाला उत्तर देताना प्रज्ञा पिसोळकर यांनी सांगितले की, इतर शाळांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर आम्ही ही माहिती पाठवली आहे. श्री दादा महाराज नाटेकर शाळेच्या फेसबुक पेजवरही व्हिडियोसहीत पीओपीच्या मूर्तींपासून द्रवरूप खत आणि फक्की कशी तयार करायची यासंदर्भातील माहिती वाचता येईल याशिवाय आम्ही बऱ्याच जणांना तोंडीही या प्रयोगाचे महत्त्व सांगत आहोत.

रासायनिक प्रक्रिया…
पीओपीच्या मूर्तीचं पर्यावरणपूरक विघटन करण्याची कल्पना आम्हाला रसायनशास्रज्ञ जयंत गाडगीळ यांनी दिली. पीओपी म्हणजे CASO4 (calcium sulphate) हे रसायन असतं. हे रसायन अमोनियम बायकार्बोनेट NH4HCO3 (Ammonium bicarbonate)या रसायनामध्ये विरघळवले जाते. या प्रक्रियेतून आपल्याला CACO3 (Calcium carbonate) म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट ही पूड मिळते आणि त्याचबरोबर NH4SO4 (Ammonium sulfate) हे अमोनियम सल्फेट हे खत मिळते आणि त्याचबरोबर पाण्यात CO2 (Carbon dioxide)मिसळला जातो त्यातून कार्बोलिक अॅसिड तयार होतं. या प्रयोगातून मिळालेलं उत्पादन CACO3 (Calcium carbonate) हे उन्हामध्ये वाळवलं जातं. याचा वापर मैदान आखण्यासाठी फक्की म्हणून केला जातो. त्याचबरोबर अमोनियम सल्फेट हे जे द्रवरूप खत आहे. ते पाण्यामध्ये विरघळवलं जातं आणि शाळेच्या शेतीमध्ये त्याचा वापर केला जातो, अशी माहिती संचालिका पिसोळकर यांनी दिली.

Photo courtesy@Google 1

अमोनियम सल्फेटचे फायदे…
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीं बादलीमध्ये ठेवतात. त्यावर अमोनियम बायकार्बोनेटमार्फत रासायनिक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे मूर्ती विरघळण्यास मदत होते. मूर्ती विरघळायला साधारण एक दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर ‘अमोनियम सल्फेट’ हे द्रवरूप खत तयार होते आणि बादलीच्या तळाला चुना म्हणजे म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट शिल्लक राहते. अमोनियम सल्फेट हे दर्जेदार खत आहे. ते बागेतील फुलझाडे आणि कोणत्याही प्रकारच्या पिकासाठी उपयोगात येते. भविष्यात या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात होणारे नदी प्रदूषण टाळण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

Photo courtesy@Google 3

विद्यार्थ्यांना मिळाली शिकवण…
पीओपीच्या मूर्ती वापरू नयेत. मूर्ती जेवढ्या मोठ्या असणं तितकं पर्यावरणासाठी घातक आहे आणि पीओपीचे विघटन करता येते, पण हे काम खर्चिक आणि वेळखाऊ असतं. त्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. यामुळे मातीच्या छोट्या गणेशमूर्ती स्वत:च्या हाताने बनवणं आणि त्या आपल्या बागेत विसर्जित करणं, हा त्यावरचा उत्तम उपाय आहे, ही शिकवण मुलांना रसायनशास्त्रज्ञ जयंत गाडगीळ यांनी शिकवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगातून मिळाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.