Dr. Sudhakar Shinde : स्वच्छतेच्या सवयींमध्ये नागरी शिस्त व सहभाग वाढवा

अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे निर्देश

69
Dr. Sudhakar Shinde : स्वच्छतेच्या सवयींमध्ये नागरी शिस्त व सहभाग वाढवा
Dr. Sudhakar Shinde : स्वच्छतेच्या सवयींमध्ये नागरी शिस्त व सहभाग वाढवा

लोकसहभागाशिवाय स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य होवू शकत नाही, त्यामुळे स्वच्छतेच्या सवयींमध्ये नागरी शिस्त व सहभाग वाढवण्यासाठी व्यापक व दीर्घकालीन जनजागृती अभियान हाती घ्यावे. कचरा वर्गीकरण, दैनंदिन कार्यपद्धतीमध्ये सुधारणा इत्यादी विषयांवर कनिष्ठ अवेक्षक (Junior Overseer) यांचे प्रशिक्षण घ्यावे, प्रगत परिसर व्यवस्थापन (Advance Locality Management), रहिवासी कल्याण संघटना (Resident Welfare Association) यासारख्या संकल्पनांना अधिक बळ द्यावे. तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने मुंबईतील बिगर शासकीय संस्थांचा कचरा व्यवस्थापन कार्यपद्धतीमध्ये सहभाग वाढवावा, आदी निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी या बैठकीत दिले.

मुंबईतील दैनंदिन स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन याबाबतचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवार (दिनांक ४ सप्टेंबर २०२३) आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत वेगवेगळ्या बाबींवर सर्व उपस्थितांशी सविस्तर चर्चा करुन विविध निर्देश दिले. उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पळणीटकर, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मुंबई महानगरातील दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता ही आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी असली पाहिजे आणि त्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा. तसेच स्वच्छता ही लोकसहभागातून साध्य होणारी बाब आहे. त्यामुळे लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीनेव्यापक अभियान राबवावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील इतर नियोजन प्राधिकरणांसमवेत स्वच्छतेसंदर्भातील समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून लवकरच वरिष्ठ स्तरावर बैठक आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विविध सार्वजनिक परिसरांमध्ये नुकत्याच भेटी देवून स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली होती. तसेच स्वच्छता व कचरा व्यवस्थापनामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाला सूचना देखील केल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्यात, या संदर्भात सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच त्याची प्राथमिक रुपरेषा ठरवण्यात आली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता हे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे व महत्त्वाचे विषय असतात. विशेषतः स्वच्छता ही आरोग्य जपणुकीसाठी प्राधान्याची असते. मुंबई महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जा असून त्याला साजेशी सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनामध्ये आता आमूलाग्र बदल होणे गरजेचे असून त्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात यावा. घनकचरा व्यवस्थापनाचा सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने विविध सल्लागार, इतर शहर अथवा या क्षेत्रातील संस्थांचे कृती आराखडे यांचा अभ्यास करावा. स्वच्छतेमध्ये नावलौकिक असलेल्या शहरांमध्ये प्रत्यक्ष भेटी देवून त्यांचे यशस्वी प्रकल्प, धोरणे, कार्यपद्धती, तंत्रज्ञान यांचा अंगीकार करता येईल किंवा कसे, याची चाचपणी करावी, अशी सूचनाही अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी केली.

(हेही वाचा – Maratha Reservation : महायुती सरकारने दिलेले मराठा आरक्षण ठाकरे सरकारने घालवले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

दरम्यान, मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेने मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअॅप हेल्पलाईन सुरु केली. त्या माध्यमातून मुंबईकरांना कचऱयाबाबतच्या सूचना व तक्रारी छायाचित्रासह नोंदवणे सोपे झाले आहे. या तक्रारींचा झटपट निपटारा करण्यासाठी प्रशासनाला देखील फायदा होत आहे. याच धर्तीवर आता पुढे जावून महानगरपालिकेच्या घनकचरा यंत्रणेवर दैनंदिन देखरेख करण्यासाठी स्वतंत्र अॅप विकसित करावे. त्यामध्ये परिसरनिहाय जबाबदारी असणारे मनुष्यबळ, त्यांनी दररोज केलेली स्वच्छता यांचे निरीक्षण करण्याची सोय इत्यादी गोष्टी अंतर्भूत कराव्यात, असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी बैठकीत दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.