HMIS: महापालिका रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीची अंमलबजावणी

769
HMIS: महापालिका रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीची अंमलबजावणी
HMIS: महापालिका रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीची अंमलबजावणी
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने अद्ययावत स्वरूपाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत एकूण चार टप्प्यांमध्ये या प्रणालीची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा घेणाऱ्या नागरिकांना या प्रणालीमुळे अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांना आरोग्य सुविधांसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या अनुषंगाने ही प्रणाली महत्वाची ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये आरोग्य सेवा पुरवताना अधिकाधिक तंत्रज्ञानावर भर देतानाच प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. आरोग्याशी संबंधित सेवा घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. नियोजित कालावधीत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी या प्रणालीची अमंलबजावणी करण्यासाठी विशेष मेहनत घेत याची निविदा यशस्वी करत मंजुरी घेत कार्यादेश संबंधित कंपनीला दिले होते.

(हेही वाचा – Water Cut : पश्चिम उपनगरांतील या भागांत सोमवारी पाणीकपात)

रूग्ण रूग्णालयात आल्यानंतर रूग्णाची नोंद, डॉक्टरांचा सल्ला घेणे, आवश्यक असल्यास निदान चाचणी करणे, त्यानंतर औषधालयाच्या माध्यमातून औषध उपलब्ध करून देणे ही सर्व प्रक्रिया प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक रूग्णालयात रूग्णाला एक युनिक कोड उपलब्ध करून दिला जाईल. ही प्रणाली महानगरपालिकेचे दवाखाने, रूग्णालयाच्या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कोणत्याही दवाखाना किंवा रूग्णालयात याआधी उपचार घेतले असल्यास रूग्णाशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर नव्या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

एखाद्या रूग्णाला दुसऱ्या रूग्णालयात संदर्भीत करण्यासाठीही या प्रणालीचा वापर करण्यात येईल. या प्रणालीच्या वापराने रूग्णांना विनासायास सेवा प्राप्त करणे शक्य होईल. रूग्णालयात केस पेपरसाठीची रांग कमी करण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करणेही या प्रणालीमुळे शक्य आहे. तसेच रूग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना उपलब्ध होणे शक्य होणार आहे. या सर्व बाबींसाठी प्रणालीचा वापर सहजरीत्या करता येईल. तसेच भविष्यात काही दुर्धर आजारांमध्ये टेली कन्सलटन्सीचा वापर करावा लागला तर ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

(हेही वाचा – Ganesh Chaturthi 2024 : श्री गणरायांच्या आगमन आणि विसर्जन मार्गातील त्या १३ पुलांवरील विघ्न यंदाही कायम)

HMIS अंमलबजावणीचे फायदे

रूग्णांशी संबंधित विभागअंतर्गत माहिती वहन प्रक्रिया अधिक सुलभ होईल. आरोग्य सुविधांचे सुयोग्यरित्या व्यवस्थापन करणे शक्य होईल. रूग्णालयाच्या ठिकाणी रूग्णांशी संबंधित आजारांची स्वतंत्र माहिती तयार करण्यासोबतच संशोधनासाठीही वाव मिळेल.

महानगरपालिकेचे दवाखाने, रूग्णालये याठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधेसाठी येणाऱ्या बाह्य रूग्णांसाठी आणि अपघात विभागासाठी व्यवस्थापन प्रणाली विकसित करणेही यामुळे शक्य होईल. राज्य पातळीवरील आणि केंद्राच्या आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी यंत्रणेचा मुख्यत्वेकरून प्रभावी वापर करता येईल. त्यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांनाही दैनंदिन कामामध्ये प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. तसेच औषध पुरवठा व्यवस्थापन करतानाच नियोजन तसेच भविष्यातील गरजेनुसार तयारी करण्यासाठीही या प्रणालीचा उपयोग होणार आहे.

(हेही वाचा – यापुढे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून ‘पीओपीची गणेशमूर्ती स्थापन करणार नाही’, असे हमीपत्र घ्या; Bombay High Court चा आदेश)

चार टप्प्यांमध्ये होणार अंमलबजावणी

प्रकल्प अभ्यास, हार्डवेअर आणि नेटवर्कींग सर्वेक्षण, प्रकल्प आराखडा तयार करण्यात येईल. त्यासोबतच प्रकल्पासाठीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने वितरण, यंत्रणेची चाचपणी, डिझाईन, विकास आणि HMIS एप्लिकेशनची अंमलबजावणी आदी बाबींवर काम करण्यात येईल. त्यानंतर विद्यमान प्रणालीअंतर्गत असणाऱ्या रूग्णांशी संबंधित माहितीचे हस्तांतर हे नव्या HMIS प्रणाली अंतर्गत करण्यात येईल. सॉफ्टवेअर आणि क्लाऊड प्रणालीचाही वापर या यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येईल. तसेच एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठविणे, तज्ञांची वेळ घेणे ही या प्रणालीमध्ये समविष्ट आहे. या सोबत भविष्यात विविध संशोधनासाठी या प्रणालीची मदत होणार आहे.

महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये या यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यापाठोपाठ सर्व प्रसुतिगृहांच्या ठिकाणी योजना अंमलात येईल. महानगरपालिकेची सर्व उपनगरीय रूग्णालये तसेच विशेष रूग्णालयाच्या ठिकाणी पुढच्या टप्प्यात यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच शेवटच्या टप्प्यात सर्व महत्वाच्या रूग्णालयात ही यंत्रणा अंमलात येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.