Gautam Adani in Trouble : अदानी समुहावर पुन्हा हिंडेनबर्गसारखे आरोप, शेअरमध्ये मोठी घसरण

अदानी समुहाच्या शेअर्समध्ये देशाबाहेरील ‘ओपेक’ फंडांकडून अवैधरित्या लाखो अमेरिकन डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

30
Gautam Adani in Trouble : अदानी समुहावर पुन्हा हिंडेनबर्गसारखे आरोप, शेअरमध्ये मोठी घसरण
Gautam Adani in Trouble : अदानी समुहावर पुन्हा हिंडेनबर्गसारखे आरोप, शेअरमध्ये मोठी घसरण
  • ऋजुता लुकतुके

हिंडेनबर्ग पाठोपाठ एका नवीन संस्थेनं केलेल्या शोध पत्रकारितेत पुन्हा एकदा अदानींवर कृत्रिमरीत्या शेअरच्या किमती वाढवल्याचे आरोप झाले आहेत. काय आहे सगळं प्रकरण बघूया. अदानी समुहाच्या शेअर्समध्ये देशाबाहेरील ‘ओपेक’ फंडांकडून अवैधरित्या लाखो अमेरिकन डॉलरची गुंतवणूक झाली आहे. आणि या गुंतवणुकीतून अदानी समुहाचे समभाग कृत्रिमरित्या वाढवले जातात असा नवीन एक अहवाल समोर आला आहे. यावेळी आरोप करणारी संस्था आहे शोध पत्रकारिता करणारा एक पत्रकारांचा गट. त्याचं नाव आहे ऑर्गेनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्ट प्रोजेक्ट.

या गटाने अदानी समुहाविरुद्ध कागदी पुरावे असल्याचा दावा केला आहे. मॉरिशस मधील काही फंडांमध्ये अदानी समुहातील नातेवाईकांच्या गुंतवणुकी आहेत. आणि हे फंड अदानी समुहातील शेअरमध्ये लाखो अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करत आहेत, असा पत्रकारांच्या गटाचा आरोप आहे. या गुंतवणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअरमध्ये गुंतवणूक होऊन शेअरचे भाव वाढतायत, असा हा सगळा खेळ आहे.

म्हणजेच अदानी समुहाचे शेअर कंपनीच्या कामगिरीमुळे नाही तर छुप्या गुंतवणुकीमुळे फुगवले जात आहेत, असा हा स्पष्ट आरोप आहे. तसं असेल तर देशांतर्गत गुंतवणुकदारांची ही फसवणूक ठरेल. अर्थात, सध्या अदानी समुहाने त्यांच्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. हा हिंडेनबर्ग सारखा आणखी एक प्रयत्न असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पण, हे सगळं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया…

OCCRP चे नेमके आरोप काय आहेत?

ओसीसीआरपी या पत्रकारांच्या गटाने दोन गुंतवणूकदारांचे व्यवहार जगासमोर आणले आहेत. नासिर अल शबन अहली आणि चीनमधील चँग चुंग लिन. या दोघांचे अदानी समुहातील अधिकाऱ्यांशी आणि अदानींच्या नातेवाईकांशी घनिष्ठ संबंध आहेत. या दोघांच्या माध्यमातून अदानी समुहात परदेशातील फंडांकडून गुंतवणूक होत होती, असा पत्रकारांच्या गटाचा दावा आहे. त्यांनी २०१६ मधील कंपनीचे काही व्यवहार त्यासाठी उघड केले आहेत. नासिर आणि चँग यांच्याकडे २०१६ मध्ये अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांचे अनुक्रमे ८ आणि १४ टक्के शेअर होते, असं पत्रकारांच्या गटाचं म्हणणं आहे.

इतकंच नाही तर या कालावधीत दोघांकडे असलेल्या अदानी शेअरचं मूल्य ४३० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं होतं, असंही या गटाने म्हटलं आहे. सेबीचा नियम असं सांगतो की, एका समुहाला शेअर किमतीत ढवळाढवळ करता येऊ नये यासाठी एकाच व्यक्तीकडे २५ टक्क्यांच्या वर कंपनीचे समभाग असू नयेत. या नियमाला इथं थेट हरताळ फासलेला दिसून येतो. अर्था सध्या पत्रकारांच्या गटाने केलेला हा आरोप आहे.

अदानी समुहावर असाच आरोप जानेवारी २०२३ मध्ये अमेरिकन संशोधन संस्था हिंडेनबर्ग यांनी केला होता. पण, त्यानंतरच्या चौकशीत अदानी समुहावर आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा आणि त्यांचा फायदा व्यवसायात करून घेतल्याचाही आरोप होतो. आताच्या अहवालात नासिर आणि चँग या दोघांचा गौतम अदानांचे भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंध होता तसंच ते अदानी समुहाच्या कंपन्यांशी थेट व्यवहार करत होते, असे पुरावे सादर करण्यात आले आहेत.

अदानींची प्रतिक्रिया काय?

अदानी समुहाने या प्रकरणावर आपलं जाहीर निवेदन दिलं आहे. ओसीसीआरपीच्या पत्रकारांनी केलेले आरोप यात फेटाळण्यात आले आहेत. उलट अदानी समुहाचे शेअर खाली यावेत यासाठी हा कट रचण्यात आल्याचा दावा या पत्रकात करण्यात आला आहे.

त्याचबरोबर अदानी समुहाने भारतीय न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ओसीसीआरपी संस्थेनं सांगितलेला कालावधी आणि त्यात अदानी समुहाच्या शेअरमध्ये झालेले व्यवहार हे हिंडेनबर्ग अहवालातही नमूद केलेले होते आणि त्यांची चौकशी भारतीय न्याय व्यवस्थेकडून झालेली आहे, असा दावा अदानी समुहाने केला आहे.

पण, या ताज्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे. अदानी एंटरप्राईजेसचे समभाग ३.५ टक्क्यांनी तर अदानी पोर्ट, अदानी ग्रिन एनर्जी, अदानी टोटल गॅस तसंच अदानी विल्मर या कंपन्यांचे शेअर २ ते ४.५ टक्क्यांनी पडले.

(हेही वाचा – Mantralaya : मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना १ महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण… )

हिंडेनबर्ग आता काय म्हणतं?

ओसीसीआरपीच्या अहवालानंतर लगेचच हिंडेनबर्ग संस्थेनंही आपली भूमिका नव्याने मांडली आहे. आपण केलेलं संशोधन आणि ओसीसीआरपीचं संशोधन यात अनेक साम्यं आहेत, त्यामुळे आपला अहवाल खराच होता, याचा हा पुरावा आहे असा दावा हिंडेनबर्गने नव्याने केला आहे.

हिंडेनबर्ग यांच्या आरोपांनंतर सेबीने अदानी समुहातील शेअरच्या व्यवहारांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल अजून पूर्ण झालेला नाही. तर सर्वोच्च न्यायालयानेही सेबी अहवालाचं पुनरावलोकन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.