Ganeshotsav 2023 : बाप्पांसाठी खास 21 प्रकारचे नैवद्य; वाचा कोणते?

34

गणेशोत्सवात मोदकांना विशेष महत्त्व आहे. नारळ-गुळाच्या मोदकांचा नैवेद्य तसा सर्वांनाच परिचित आहे. त्यातपण मोदक बनवण्याची एकच पद्धत असते. महाराष्ट्रात उकडीचे किंवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र, विविध प्रांतानुसार तसेच तिथल्या पिकांनुसार तयार केलेल्या मोदकांच्या नैवेद्याचे वेगळेपण आकर्षण ठरणार आहे.

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. महिलावर्गाची देखील धावपळ सुरू आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी तांदळाचे पीठ दळून ठेवणे, याशिवाय यावेळी कोणत्या प्रकारचा नैवद्य दाखवावा, असे विचार घरातील कर्त्या महिलेला कायम सतावत असतात. त्यामुळे महिलांचा कल कायम सोप्या, पटकन होणाऱ्या रेसिपींकडे असतो. मग चला बघूया मोदकांचे २१ प्रकार कसे आहेत.

पौष्टिक पनीर

पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पूड भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा प्रकार दिल्लीला मिळतो.

खव्याचा वापर

खव्याचा मोदक हा सगळीकडे मिळणारा असा प्रकार आहे. हलवाई दरवर्षी यामध्ये विविध चवीही दरवर्षी घेऊन येतात. हाच मोदक घरी करताना खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात.

(हेही वाचा Ladakh : लडाखमधील एक इंच भूमी चीनच्या ताब्यात नाही; निवृत्त ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा यांनी राहुल गांधींना दिले उत्तर)

बेक केलेले

तळलेले आणि उकडलेले मोदक खाऊन बाप्पा आणि भाविकही कंटाळतात. त्यासाठी खास बेक केलेल्या मोदकांचा पर्याय आहे. खोबरं, किसमिस, खव्याचे सारण मैद्याच्या सप्तपारीमध्ये भरून मस्त बेक करून बाप्पाला नैवेद्य दाखवा.

गूळ-कोहळ्याचे

हा प्रकार विदर्भातील. त्यामुळे तसा कमी परिचयाचा. यासाठी गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणीक एकत्र मळावी. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळून घ्यावे.

स्वादिष्ट पुरणाचे

नुसते पुरण वाटून पानावर वाढण्यापेक्षा याच पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून त्याचे मोदक तळून किंवा वाफवूनसुद्धा घेतात.

फ्रुट मोदक

गणपतीच्या दिवसांत भरपूर फळे येतात. वेगवेगळी फळे-मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे.

मिक्स मोदक

पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

मनुकांचे मोदक

हे मोदक करण्यास सोपे आणि सर्वांनाच आवडतील, असे आहेत. मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.

तिळगुळाचे मोदक

गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावेत व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे किंवा तीळ व गुळाचे सारण गरम असतानाच साच्यामध्ये घालून मोदक करावे. हा प्रकार यवतमाळ भागात विशेषत: केला जातो.

खोबरे- मैद्याचे मोदक

हा प्रकार सर्व ठिकाणी आढळून येतो. रवा, खोबरे, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या लाटीत भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

उकडीचे मोदक

मैद्याची पारी लाटून आतमध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही गोड सारण भरून त्याचे मोदक करून वाफवून किंवा तळून घ्यावेत.

कॅरॅमलचे मोदक

मोदकांचा हा प्रकार लहानग्यांच्या पसंतीचा. यासाठी पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरॅमलमध्ये बुडवून थंड करून मगच खा.

काजूचे मोदक

काजू मोदक करताना काजूची पूड करून त्यासोबत थोडी वेलची टाकावी. यामुळे मोदकाला एक वेगळीच चव येते. काजूकतलीसाठीचे साहित्य सारणासाठी घेऊन यामध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

फुटाण्यांचे मोदक

फुटाणे बारीक करून त्यात साखर व तूप घालून चांगले मळावे. या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार चटकन करता येतो.मोदकांचा हा प्रकार लहानग्यांच्या पसंतीचा. यासाठी पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरॅमलमध्ये बुडवून थंड करून मगच खा.

तांदळाचे गुलकंदी मोदक

प्रथम तांदुळाची उकड काढून त्यात गुलाब पाकळ्या किंवा गुलाबजल टाकावे. त्यानंतर उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून मोदक केले जातात.

पोह्यांचे मोदक

पोहे चांगले भिजवून त्याचा गोळा मळावा. त्यामध्ये गूळ खोबऱ्याचे किंवा आवडीचे कोणतेही सारण भरून मंद आचेवर मोदक तळावेत.

चॉकलेट मोदक

खवा, खोबरे, दाणे बारीक करून मळून त्याला मोदकाचा आकार द्यावा. एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवा आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत चॉकलेट मोदकांनी करा.

दाण्यांचे मोदक

गूळ आणि दाणे एकत्र करून त्यात काजू, किसमिस घालावे व उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे.

बटाट्याचे मोदक

उकडलेल्या बटाट्यामध्ये खवा, साखर, काजू, किसमिस घालून त्याचा हलवा बनवावा व साच्यामध्ये घालून मोदक करावे. वरून दुधाची पावडर लावावी. हे मोदक चवीला उत्तम लागतात.

पंचखाद्याचे मोदक

पंचखाद्य म्हणजेच खारीक, खसखस, बदाम, काजू आणि साखर एकत्र करून सारण मैद्याच्या पारीत भरून डीप फ्राय करा. यात अंजीर किंवा खजुराची पेस्टही घालता येईल. हे मोदक अतिशय सुंदर लागतात आणि त्याचबरोबर पौष्टिकही असतात.

बेसनाचे मोदक

बेसनाच्या लाडूच्या कृतीप्रमाणे आधी बेसन भाजून घेऊन या सारणाला साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा. यामध्ये एक-एक काजू भरावा. म्हणजे बेसन मोदक तयार.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.