- विशेष प्रतिनिधी, मुंबई
डॉ. बाबासाहेब जातीयवादापासून मुक्त राष्ट्र पाहू इच्छित होते, जिथे प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि विकासाची समान संधी मिळेल. दारिद्र्य, असमानता यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणात आहे, हे आपण जाणतो. शिक्षणाच्या विचारांना बळ देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातील विविध राज्यांतूनही अनुयायी येतात. त्यांचे अतूट प्रेम, आदर आणि शिस्तबद्ध आचरण खरोखरच प्रेरणादायी आहे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी प्रतिपादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्त्वपूर्ण सुधारणा घडल्या, असेही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रमाचे शुक्रवारी ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते संबोधित करीत होते.
(हेही वाचा – UP College मधील बेकायदेशीर मशिदीविरोधात विद्यार्थी आक्रमक; म्हणाले, आम्ही हनुमान चालिसा पठण…)
या कार्यक्रमात, सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर, मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली.
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव उपस्थित होते. याप्रसंगी महानगरपालिकेचे उपआयुक्त (परिमंडळ २)प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक अजितकुमार आंबी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, रमेश जाधव, प्रतीक कांबळे, रवी गरुड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, अनुयायी उपस्थित होते.
(हेही वाचा – आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची ‘लाडकी कंपनी योजना’ रद्द करा; डॉ. राहुल घुले यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र)
भारताच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला
सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, एकता, बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू व व्यासंगी व्यक्तिमत्व होते. सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो. यावरून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते.
प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान मंदिर
देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामध्ये आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हे विचार कुठेही कमी पडणार नसून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
(हेही वाचा – बिल्डरची मनमानी, संतप्त Mumbai High Court चा राज्य सरकारला निर्देश; म्हणाले, राहिवाशांचे प्रश्न…)
बंधुता, एकता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद
राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार शासन करणार असून त्यामुळे त्यांच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला बंधुता, एकता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community