CM Eknath Shinde : भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी ४० कोटींची तरतूद

188
CM Eknath Shinde : भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी ४० कोटींची तरतूद
  • प्रतिनिधी

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीम पार्क साकारण्यात येणार असून त्यासाठीच्या ४० कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील १५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

राज्याच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. तसेच सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या बैठकीत दिले. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार अमळनेर (जि. जळगांव) येथील देशातील एकमेवाद्वितीय अशा मंगळग्रह देवस्थानाच्या २५ कोटींच्या विकास आराखड्यास तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशय-मौजे मुनावळे (ता. जावळी) येथील जलक्रीडा पर्यटन सुविधेसाठी ४७ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली. हे सर्व प्रस्ताव पर्यटन विभागाने सादर केले.

(हेही वाचा – Water Cut : गुरुवार आणि शुक्रवारी शहर भागांतील ‘या’ विभागांत होणार पाणीकपात)

ग्रामविकास विभागाने सादर केलेल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील १८ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगडाच्या विकास आराखड्यातील २ कोटी ६७ लाखांच्या कामांस मान्यता देण्यात आली. याशिवाय मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातील केंडबे (ता. जावळी) येथील मूळगावी स्मारक उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय नगरविकास विभागाने नागपूर शहरातील आराखडे सादर केले. त्यातील लक्ष्मीनारायण शिवमंदीर- नंदनवनच्या २४ कोटी ७३ लाखांच्या विकास आराखड्यास, कुत्तेवालेबाबा मंदीर आश्रम-शांतीनगरसाठी १३ कोटी ३५ लाख रुपये आणि मुरलीधर मंदीर पारडी विकास आराखड्यासाठी १४ कोटी ३९ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली.

पंढरपुरात भाविकांसाठी प्रशस्त दर्शन मंडप

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी नेहमीच भाविक येत असतात. आषाढी आणि कार्तिक वारीसाठी लाखो वारकरी तसेच भाविक पर्यटक पंढरपुरात येतात. त्यांच्यासाठी अद्ययावत असा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सुमारे १६ हजार चौरस मीटरच्या या मंडपात पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सहा हजार भाविकांची सोय करण्यात येईल. या सर्वांना वेळेनिहाय टोकन पद्धतीने प्रवेश देण्यात येईल. याशिवाय त्यांना स्कायवॉक पद्धतीची एक किलोमीटरची दर्शन रांगही असेल. या मंडप आणि दर्शन रांगेमुळे भाविकांना सुरक्षित, सुसह्य आणि सोयी-सुविधांनी युक्त अशी दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे.

स्कायवॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा त्रास होणार नाही. तसेच भाविकांचा दर्शनासाठी लागणार वेळ कमी होणार आहे. मंडप आणि रांगेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लिफ्ट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. याठिकाणी भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन व्हावे यासाठी टोकन पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे. निश्चित केलेल्या वेळेतच त्यांना मंडप आणि रांगेत प्रवेश दिल्याने गर्दीचेही नियंत्रण होणार आहे. याशिवाय दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

(हेही वाचा – Mukhyamantri Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ६ पुरुषांचा अनोखा प्रताप!)

भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट उलगडवून दाखवणारे स्मारक थीम पार्क रुपात साकारण्यात येणार आहे. सावरकर यांच्या निवासस्थानाच्या जवळच दोन हेक्टरवर हे थीमपार्क साकारण्यात येईल. याठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचे, संघर्षाचे दर्शन घडवणारे कथाकथन, ऑडिओ-व्हिज्युअल्स, स्वातंत्र्यलढ्यासाठी जीवन समर्पित करण्याच्या त्यांच्या शपथेपासूनचा संपूर्ण जीवन प्रवास तसेच स्वातंत्र्यवीरांचे लेखन, इतर क्रांतीकारकांच्या भेटी, ५० वर्षांची शिक्षा, अंदमान तुरुंगातील वास्तव्य हे संग्रहालयाच्या माध्यमातून सादर केले जाणार आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, समाधान अवताडे, सरोज अहिरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आदी उपस्थित होते. जळगांव, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.