छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा – CM Eknath Shinde

स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे १२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

104
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा - CM Eknath Shinde

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नाने स्वराज्य निर्मिंतीत मोलाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे १२ किल्ले नक्कीच जागतिक वारसा यादीत समाविष्ट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्को मधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महानिदेशक डॉ. जान्विज शर्मा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या क्षेत्रीय संचालक डॉ. टी. श्रीलक्ष्मी, अधीक्षक शुभा मुजुमदार, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले आदींची यावेळी उपस्थिती होती.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील लष्करी भूप्रदेश या वैशिष्ट्यपूर्ण वारशाचा समाविष्ट व्हावा यासाठी भारताकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड हे ११ आणि तमिळनाडू येथील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. या नामांकन प्रक्रियेचे ठोस समर्थन व्हावे आणि याबाबत अधिक मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष विशाल शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ गड किल्ले जागतिक वारसा नामांकन प्रक्रियेसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारतीय पुरातत्व विभाग यांचे विशेष धन्यवाद मानले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य महापुरुष होते. स्वराज्याची निर्मिती करून त्यांनी एक जाज्वल्य असा इतिहास निर्माण केला. त्यांच्या काळात झालेल्या गड किल्ल्याची निर्मिती ही त्यांची दूरदृष्टी दाखवून देते. जलदुर्गाची निर्मिती करुन त्यांनी स्वराज्य संरक्षणासाठी किती जागरुकता हवी, हे त्याकाळी दाखवून दिले. शत्रुला नामोहरम करण्यासाठी त्यावेळचे तंत्रज्ञान, वास्तू शास्त्र यांचा अप्रतिम आविष्कार त्यांनी दाखविला. शिवकालीन हे किल्ले पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आजही हे किल्ले मजबूत स्थितीत आहेत. येथील कणाकणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी आहेत. हा इतिहास आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. तो आपण जपत आहोत. त्याला जागतिक पातळीवर नेण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नमूद केले.

(हेही वाचा – रेल्वेच्या पुणे विभागाचे विषय लवकरच मार्गी लागणार; Murlidhar Mohol आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये सविस्तर चर्चा)

छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, नीती, गनिमी कावा सर्वांना अभिमानास्पद

सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य, नीती, गनिमी कावा हे आजही अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहे. त्यांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशासाठी अभिमानास्पद आहे. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने येथील गड किल्ल्यांच्या डागडुजी आणि सुधारणासाठी प्रयत्न केले. हा वारसा जपण्यासाठी अधिक निधी राज्य शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या साहाय्याने या गड किल्ल्यांना अधिक चांगले रुप देऊन सर्वांना प्रेरणा देणारा इतिहास प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सर्वांच्या सहकार्य आणि समन्वयातून निश्चितपणे जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश होईल, असे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्यांचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तेथे मद्यपान करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा राज्य शासन लवकरच आणणार असल्याची माहितीही मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.

गड किल्ल्यांशी भावनिक ओढ हे येथील वेगळेपण – विशाल शर्मा

जागतिक वारसा केंद्र समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष शर्मा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिक वारसा यादीत नोंद ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक देश हे जागतिक पातळीवर त्यांच्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे अधिक सकारात्मक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) हे किल्ले आणि तेथील इतिहास हा युनेस्कोच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचला पाहिजे. येथील गडकिल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नागरिकांची भावना ही त्याच्याशी जोडली गेली आहे. जगात इतरत्र कुठे असे पाहायला मिळत नाही. त्यामुळे ही बाब अतिशय सकारात्मक परिणाम करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक वारसा केंद्र समितीचे अधिवेशन पहिल्यांदा भारतात झाल्याचे त्यांनी नमूद केले.

येथील गड किल्ले, त्यांच्या संरक्षणासाठीचे प्रयत्न, तेथे सध्या कशा प्रकारे व्यवस्थापन केले जात आहे, स्थानिक नागरिकांचा सहभाग कसा आहे याबाबीही महत्वपूर्ण असल्याचे शर्मा यांनी सांगितले. ज्यावेळी या गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राचे प्रतिनिधी भेट देतील, त्यावेळी ही बाब प्रकर्षाने पाहिली जाईल. त्यामुळे या गडकिल्ल्यांबाबत सर्वसामान्यांसह शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यामध्ये अधिक व्यापक जनजागृती करावी. गेल्या १० वर्षात देशातील १३ स्थळांची जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झाली. त्यामुळे कमी कालावधीत उत्कृष्ट काम करुन निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे गड किल्ले जागतिक वारसा म्हणून ओळखले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. शिखा जैन यांनी जागतिक वारसा नामांकनासाठी हे गडकिल्ले निवडण्यामागे त्यांचे वेगळेपण असल्याचे नमूद केले. तसेच, जागतिक वारसा नामांकनानंतर केंद्र शासनाचा पुरातत्व विभाग आणि राज्य शासन यांच्या मदतीने यासाठीचे सादरीकरण कशा प्रकारे करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जान्विज शर्मा यांनी जागतिक वारसा यादीत या गड किल्ल्यांचा समावेश व्हावा, यासाठी काम सुरु केले असलल्याचे सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव खारगे यांनी राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने यापूर्वीच कामाला सुरुवात केली असल्याचे सांगितले. राज्याने महावारसा समिती स्थापन करुन गड किल्ले विकासासाठी राज्य स्तर, जिल्हा स्तर आणि प्रत्यक्ष संबंधित गड किल्ले याठिकाणी अशा समिती स्थापन केल्या आहेत. त्यानुसार काम सुरु आहे. याशिवाय, आता जागतिक वारसा नामांकनानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर समिती असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले. जागतिक वारसा नामांकनाबाबत अधिक जनजागृती व्हावी, यासाठी विद्यार्थी, युवा यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून सर्वांचा सहभाग निश्चितपणे वाढविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.