CC Road : अभिजित बांगरांचे आदेश, २४० दिवसांत सिमेंट काँक्रिटचे रस्ते पूर्ण करा!

641
CC Road : अभिजित बांगरांचे आदेश, २४० दिवसांत सिमेंट काँक्रिटचे रस्ते पूर्ण करा!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण (CC Road) कामे प्रगती पथावर आहेत. पावसाळा संपल्यावर म्हणजेच १ ऑक्टोबर २०२४ पासून ते ३१ मे २०२५ या २४० दिवसांच्या कालावधीत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने पूर्ण झाली पाहिजेत. त्याचवेळी दर्जा, गुणवत्ता यांच्याशी कदापि तडजोड केली जाणार नाही, याची दक्षता घ्या असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यापूर्वी रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करा, उपयोगिता सेवा वाहिन्या संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवा. दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे तसेच दुसरा टप्प्यातील कामे अधिकाधिक गतीने पूर्ण व्हावीत या दृष्टीने नियोजन करावे, असेही निर्देश बांगर यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण (CC Road) करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते कामांचा आढावा घेत या संदर्भात आवश्यक ते कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात रस्ते व वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम यांच्यासह संबंधित अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

(हेही वाचा – मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार; Eknath Khadse यांचा खुलासा)

सिमेंट काँक्रिट रस्ते (CC Road) बनवण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरु होईपर्यंत साधारणतः ३० – ४५ दिवसांचा कालावधी जातो. दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी त्यांच्या कार्य क्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील काँक्रिटीकरण रस्त्यांची यादी तयार करावी.प्रत्येक महिन्यांचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. त्याचा सुयोग्य पाठपुरावा करावा. रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. जो रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे तो रस्ता प्राधान्याने पूर्ण करावा. अपूर्ण अवस्थेतील रस्ते पूर्ण करूनच नवीन काम काम हाती घ्यावे. कंत्राटदारांनीही एकावेळी अधिक ठिकाणी कामे हाती घेऊन ती वेगाने पूर्णत्वास न्यावीत. वाहतूक पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) प्राप्त करून घेण्याकामी महानगरपालिका समन्वय राखेल, असे देखील बांगर यांनी स्पष्ट केले.

तयार झालेला रास्ता पुन्हा पुन्हा खोदण्याची गरज पडत कामा नये

उपयोगिता सेवा वाहिन्या संदर्भात मार्गदर्शन करताना बांगर म्हणाले की, महानगरपालिकेच्या जलअभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मलनिःसारण प्रकल्प आदी विविध विभागांशी समन्वय ठेऊन रस्ते कामे पूर्ण करावी. त्याचबरोबर विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांच्याशी संपर्क साधून, महानगरपालिकेने रस्ते विकासाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याची माहिती त्यांना द्यावी. त्यांची या रस्त्यावर काही कामे असतील ती कामे आणि रस्ते विकासाची कामे यांचा सुयोग्य मेळ घालूनच करावीत. विविध विभाग, सेवा देणाऱ्या कंपन्या यांच्याशी योग्य संपर्क राखला तर निश्चित वेळेत रस्ते काम पूर्णत्वाला नेणे शक्य आहे असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana Scam: ३० आधारकार्डचा गैरवापर करून लाटले लाडक्या बहि‍णींचे पैसे; साताऱ्यातील धक्कादायक प्रकार उघड)

सिमेंट काँक्रिटीकरण (CC Road) कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) यांची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासाची अंमलबजावणी सुरु करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थे (IIT) कडे सोपविण्यात आली आहे. यामध्ये काँक्रिट प्लांटपासून ते काँक्रिट रस्त्यावर क्युरिंग करण्यापर्यंतच्या कामाचा समावेश असेल. विविध चाचण्यांच्या माध्यमातून दर्जा तपासला जाईल. अधिकारी व कंत्राटदार यांना गुणवत्तेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडे आहे. येत्या आठवड्याभरात महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात सामंजस्य करार (MoU) केला जाईल, असेही बांगर यांनी नमूद केले. महानगरपालिकेच्या दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर (Field) उपस्थित राहून दैनंदिन कामाचा आढावा घ्यावा. गतीने काम पूर्ण करावे असे निर्देशही बांगर यांनी दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.