मेट्रो-४चा मार्ग मोकळा; प्रकल्पाविरोधातील दोन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

5

मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या वडाळा-कासारवडवली, मार्गावरच्या मेट्रो-४ विरोधातील दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. त्यामुळे आता मेट्रो-४ प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान घाटकोपर परिसरातील मेट्रो-४ प्रकल्पाचे काम जवळपास दोन वर्षांपासून रखडले होते. पण आता न्यायालयाच्या दिलाशामुळे हे काम आता मार्गी लागणार आहे.

इंडो निप्पॉन कंपनी आणि श्री यशवंत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने मेट्रो-४ विरोधात याचिका दाखल केल्या होत्या. याचिकेमध्ये या प्रकल्पामुळे घाटकोपरमधील आमची जमीन बाधित होत आहे, असे इंडो निप्पॉन कंपनी म्हणत होती, तर श्री यशवंत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने रोडिया नगरमधील आमच्या सोसायटीसमोर होणाऱ्या बांधकामाने आमचे नुकसान होणार असल्याचे सांगितले होते. या दोन्ही याचिकेवर गुरुवारी, ३० मार्चला न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने निर्णय जाहीर करून त्या फेटाळून लावल्या.

हा प्रकल्प राबवण्याचे एमएमआरडीएला पूर्ण अधिकार आहे. तसेच मेट्रो कायदा अंर्तगत भूसंपादन प्रक्रिया करण्यासाठी सरकारला बंधन नाही. त्यामुळे यात काहीही अवैध्य नाही, असा युक्तिवाद राज्य सरकार आणि एमएमआरडीएच्या बाजूने महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ आणि अॅड. अक्षय शिंदे यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानून मेट्रो-४ विरोधातील दोन्ही याचिका फेटाळून लावल्या.

(हेही वाचा – उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मध्य रेल्वे १०० समर स्पेशल चालविणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.