Genesh Idol : पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार; मूर्ती बनवण्यासाठी शाडू माती उपलब्ध करून देणार

राज्यातील विविध भागातून किंवा आवश्यकता भासल्यास बाहेरील राज्यातूनही शाडूची माती आणून त्याचा मूर्तीकारांना पुरवठा करावा असेही निर्देश परिमंडळीय सह आयुक्त / उपायुक्तांना देण्यात आले.

153

श्री गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांना मोफत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान दिले आहेत. विशेष म्हणजे सदर ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने प्रायोगिक स्तरावर काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करुन देण्याचेही निर्देश परिमंडळीय उपायुक्तांना देण्यात आले आहेत.

दूरदृश्य प्रणालीद्वारे(ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरसी) आयोजित या विशेष बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अतिरिक्त आयुक्त (प्रभारी) (पश्चिम उपनगरे) रमेश पवार यांच्यासह सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाचा संदर्भ देत आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित अधिकरण (एन.जी.टी.) यांनी दिलेल्या आदेशांचा संदर्भ देत सांगितले की, यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध स्तरिय कार्यवाही करित आहे.

येत्या सप्टेंबरमध्ये येणा-या श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांना मोफत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान दिले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारले जाणारे शुल्क व अनामत रक्कम माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान ज्या गणेशोत्सव मंडळांची शुल्क व अनामत रक्कम जमा असेल, त्यांना ती पुढील ७ दिवसांच्या आत परत करण्याचेही निर्देश महानगरपालिका आयुक्त महोदयांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले आहेत.

(हेही वाचा Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवणाऱ्यांनी हातात धातूच्या वस्तू का बाळगल्या होत्या? – महंत अनिकेतशास्त्री)

याच कार्यवाहीचा भाग म्हणून सन २०२३ च्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावरील गणेशोत्सवासाठी ४ फूट पर्यंत उंची असणा-या मूर्त्या या केवळ शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात येणा-या मूर्तींवर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रतिबंध असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती घडविणा-या मूर्तीकारांना महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एका ठिकाणी मोफत जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देतानाच यासाठी योग्य जागा शोधण्याचे व निर्धारित करण्याचे निर्देश परिमंडळीय सह आयुक्त / उपायुक्तांना या बैठकीदरम्यान देण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून या मूर्तीकारांना मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असणारी शाडूची माती काही प्रमाणात मोफत उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले. यासाठी राज्यातील विविध भागातून किंवा आवश्यकता भासल्यास बाहेरील राज्यातूनही शाडूची माती आणून त्याचा मूर्तीकारांना पुरवठा करावा असेही निर्देश परिमंडळीय सह आयुक्त / उपायुक्तांना देण्यात आले.

झाडांवर हिरव्या रंगाच्या छटा..

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत सध्या मुंबई शहरात करण्यात येणा-या सुशोभीकरणासाठी रोशणाईचे रंग देखील पर्यावरणपूरक असावेत. झाडांना जी रोशणाई करण्यात येणार आहे, त्यासाठी प्रामुख्याने हिरव्या रंगातील विविध छटांचा वापर करावा, असे निर्देश आयुक्त महोदयांनी यावेळी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.