BMC : बढतीसाठी पात्र अभियंत्यांना डावलून आयुक्तांनी मर्जीतील अधिकाऱ्यांना प्रभारी प्रमुख अभियंतापदी नेमले

हिंदुस्थान पोस्टने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर आयुक्तांनी या यादीबाबत हालचाल करून पुढील ३० मे रोजी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.

426
BMC
BMC : बढतीसाठी पात्र अभियंत्यांना डावलून आयुक्तांनी मर्जीतील अधिकाऱ्यांना प्रभारी प्रमुख अभियंतापदी नेमले

विशेष प्रतिनिधी, मुंबई

आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा (BMC) कारभार सध्या प्रशासकाच्या हाती असून या महापालिकेत तब्बल ११ खात्यांचे प्रमुख अभियंता पदांची पदे रिक्त आहेत. उपप्रमुख अभियंता पदावरील अभियंत्यांची सेवा ज्येष्ठत्वानुसार प्रमुख अभियंता पदी वर्णी लावली जाते. यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार यादीही तयार झाली असून या प्रमोशन कमिटीने बनवलेल्या यादी पैकी एकही अभियंता हा प्रमुख अभियंता पदी नसून आयुक्तांनी आपल्या मर्जीतील आणि यादीत समावेश नसलेल्या अभियंत्यांची वर्णी लावत त्यांची नेमणूक प्रभारी म्हणून केली आहे. यादीतील अभियंत्यांची वर्णी लावणे अपेक्षित असताना (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची प्रभारी नेमणूक करत पात्र अभियंत्यांना त्यांच्या बढती पासून लांब ठेवत एक प्रकारे ‘हम करे सो कायदा’ची झलक दाखवली. महापालिकेत प्रशासक राजवट असतानाही महापालिकेतील प्रमुख अभियंता ही पदे प्रभारी ठेवत आयुक्त हे ३० ते ३२ वर्षे महापालिकेची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती पासून वंचित ठेवत असून अभियंत्यांच्या संघटना मात्र शेपूट घालून बसल्या आहेत.

मुंबई महापालिकेत (BMC) नगर अभियंता विभाग, जल अभियंता खाते, रस्ते विभाग, मलनिस्सारण प्रकल्प विभाग, पाणी पुरवठा प्रकल्प विभाग, दक्षता विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग, इमारत प्रस्ताव व विकास नियोजन विभाग, सागरी किनारा प्रकल्प, मुंबई मलनिस्सारण प्रकल्प आणि विद्युत व यांत्रिक विभाग असे एकूण ११ खाती व विभागाच्या प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी आजही प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती आहे. तर बिल्डिंग मेंटनन्स विभाग, मलनिस्सारण प्रचालन विभाग आणि नागरी प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणी कायम प्रमुख अभियंता नेमण्यात आले.

(हेही वाचा – BMC : पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या खड्डे मुक्तीसाठी प्रशासनाने घेतला ‘त्या’ कंत्राटदाराला काम देण्याचा निर्णय)

याबाबत हिंदुस्थान पोस्टने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर आयुक्तांनी या यादीबाबत हालचाल करून पुढील ३० मे रोजी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. परंतु पात्र यादी पैकी एकाही अधिकाऱ्याची नेमून प्रमुख अभियंता पदी केली नाही. उलट नगर अभियंता आणि प्रमुख अभियंता (दक्षता) या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपप्रमुख अभियंत्यांवर सोपवण्यात आला. परंतु या दोन्ही अभियंत्यांची नावे प्रमोशन कमिटीच्या यादीत नाही. यादीच्या बाहेरील अधिकाऱ्यांची वर्णी लावून एकप्रकारे आयुक्तांनी आपल्या मर्जीतील आणि ‘येस सर म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांची वर्णी प्रभारी म्हणून नेमून या पदावर पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या यादीतील दोन अभियंते (BMC) हे येत्या काही दिवसांमध्ये निवृत्त होत असून किमान आपल्या सेवा कालावधीत प्रमुख अभियंता, संचालक किंवा उपायुक्त बनण्याचा प्रत्येक सेवेत लागलेल्या अभियंत्यांची इच्छा असते. परंतु, त्यांना डावलून आयुक्तांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावून आपल्याला अपेक्षीत अशी कामे करून घेण्याचा सपाटा लावला आहे. प्रभारी नेमलेला अधिकारी हा आपली खुर्ची वाचवण्यासाठी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त सांगेल त्याप्रमाणे कामे करत आहेत. जे अधिकारी नियमबाह्य कामे करण्यास तयार नाही अश्या अधिकाऱ्यांना बढती दिली जात नाही. परंतु आज नियमबाह्य केलेल्या कामाचा फटका हा सनदी अधिकाऱ्यांना बसणार नसून भविष्यात या बाबत त्रुटी किंवा काही आरोप झाल्यास तिथे फक्त फासावर अभियंत्यांना/ अधिकाऱ्यांना चढवले जाते आणि हे सनदी अधिकारी नामानिराळे राहतात.

हेही पहा – 

आपल्याच खात्याच्या कामाची चौकशी प्रमुख अभियंता(दक्षता) कसे करणार

उपप्रमुख अभियंता (इमारत बांधकाम) गिरीश निकम यांच्याकडे प्रभारी नगर अभियंता (BMC) पदाचा भार सोपवला होता, परंतु आता त्यांची नियुक्ती प्रभारी प्रमुख अभियंता(दक्षता) पदी करण्यात आली आहे. प्रमुख अभियंता(दक्षता)पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांच्याकडे मूळ कार्यभार हा इमारत बांधकाम विभागाचा असून जर या विभागाच्या कामकाजाची दक्षता विभागामार्फत चौकशी करायची झाल्यास संबंधित अधिकारी निकम हे करतील. आपल्याच विभागातर्गत कामाची निकम कसे करू शकतील असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पदावर उप प्रमुख अभियंता(इमारत बांधकाम) यांच्याकडे प्रमुख अभियंता (दक्षता) विभागाचा पदभार कसा सोपवू शकतात. यासाठी निकम यांची बदली उपप्रमुख अभियंता(दक्षता) पदी करून तिथून त्यांच्याकडे प्रमुख अभियंता(दक्षता) पदाची जबाबदारी सोपवून त्यांची प्रभारी म्हणून नेमणूक करता असती. परंतु आता एकतर आयुक्त (BMC) स्वतः गोंधळलेले आहेत किंवा त्यांना गोंधळात टाकून असे निर्णय घेण्यास भाग पाडले जाते की काय असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.