BMC : डॉ. विपिन शर्मा यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार

131
BMC : डॉ. विपिन शर्मा यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार
BMC : डॉ. विपिन शर्मा यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी शनिवारी ३१ ऑगस्‍ट २०२४ सकाळी पदभार स्वीकारला. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची देखील त्‍यांनी महानगरपालिका मुख्‍यालयात भेट घेतली. मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांचे स्वागत केले. उप आयुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) संजय कु-हाडे यांच्‍यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. शर्मा यांनी एम. बी. बी. एस. ही वैद्यकीय शाखेतील पदवी रोहतक येथील पंडित बी. डी. शर्मा आरोग्य विज्ञान संस्थेतून संपादीत केली. त्यानंतर सन २००५ मध्ये त्यांनी भारतीय प्रशासन सेवेमध्ये प्रवेश केला. मसूरी येथील लाल बहादूर शास्‍त्री राष्‍ट्रीय अकादमी येथे भारतीय प्रशासन सेवेचे प्रशिक्षण घेत असताना सर्वोत्‍कृष्‍ट प्रशिक्षणार्थी म्हणून ‘सुभाष दुआ स्‍मृती सुवर्ण पदक’ हे प्रतिष्ठेचे पदक प्रदान करून डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांना सन्‍मानित करण्‍यात आले होते. सार्वजनिक धोरण, ग्रामीण व्‍यवस्‍थापन आदी विषयांमध्‍ये देखील डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी पदव्‍युत्‍तर पदवी संपादीत केली आहे. इंग्‍लँड (युनायटेड किंग्‍डम) मधील ससेक्स स्थित इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज येथून त्‍यांनी एम. ए. (डेव्‍हलपमेंट स्‍ट‍डीज) ही पदव्‍युत्‍तर पदवी प्राप्‍त केली आहे.

(हेही वाचा – निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; आता ‘या’ तारखेला होणार Haryana Assembly Election)

प्रशासकीय सेवेच्या प्रारंभी, शर्मा यांनी लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली. तेथे सेतू ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून, एक खिडकी योजनेद्वारे ३५४ शासकीय सेवा नागरिकांना थेट मिळवून देण्याचा उपक्रम डॉ. शर्मा यांनी राबवला व तो पुढे राज्यात अनुकरणीय ठरला.

राज्‍याचे साखर आयुक्‍त या नात्याने कार्यरत असताना ऊसाचे महसूली उत्त्पन्न शेतकरी व साखर कारखान्यांमध्ये विभागून किंमत ठरवण्यासाठी डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी अंमलात आणलेली पद्धती पुढे केंद्र शासनाने देखील स्वीकारली. शिक्षण आयुक्‍त, महाराष्‍ट्र ऊर्जा विकास महामंडळाचे (मेडा) महासंचालक म्हणून त्यांनी लोकाभिमुख कामकाजातून ठसा उमटवला.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्‍त आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे पुणे हे २०१९-२०२२ मध्ये देशातील राहण्यासाठी सर्वात सुखकर शहरांमध्ये अग्रणी शहर म्हणून समाविष्ट झाले.

तसेच, ठाणे महानगरपालिका आयुक्त पदाची धुरा सांभाळताना जून २०२० ते २०२२ पर्यंत कोविड १९ विषाणू संसर्गाच्या कालावधीत त्यांनी कोविड व्यवस्थापन व नियंत्रणाची आव्हानात्मक कामे यशस्वीपणे पार पाडली. माझी वसुंधरा अभियानात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाकरीता राज्यात सर्वोत्कृष्ट शहर, कचरामुक्त शहर अभियान अंतर्गत २०२१ मध्ये तीन तारांकीत मानांकन असे बहुमान त्यांनी ठाणे शहराला त्यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली प्राप्त झाले. ठाण्यातील पायाभूत सुविधा विकासासह तलाव संवर्धन, शहर सुशोभीकरण व स्मार्ट स्ट्रीट याकरीता त्यांनी राबवलेले उपक्रम नावाजले गेले.

(हेही वाचा – Shiv Sena UBT ची पोस्टरबाजी झाली बूमरँग)

अलीकडे महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कामकाज पाहत होते. महाराष्ट्रात गुंतवणूकवाढीसाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध प्रयत्न केले. परिणामी, २०२३ व २०२४ या दोन वर्षांतील दावोसमध्ये पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून एकूण ४९ बिलियन डॉलर्स किंमतीचे सामंजस्य करार करण्यात आले. ही महाराष्ट्राची जागतिक पातळीवरील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

एकूण १९ वर्षांच्‍या प्रशासकीय कारकीर्दीत डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी महाराष्‍ट्र शासनामध्‍ये विविध पदांच्‍या जबाबदा-या सांभाळताना विशेष ठसा उमटवला असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय धोरण अकादमी तसेच मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे अभ्यागत व्याख्याते या नात्याने डॉ. शर्मा यांना निमंत्रित केले जाते. प्रशासन, ई-गव्हर्नन्स, प्रशासनातील नैतिक मूल्ये, विकास व सार्वजनिक धोरणे आदी महत्त्वाच्या विषयांवर ते व्याख्यान देत असतात. प्रशासन, विकास, प्रशासकीय नेतृत्व, नावीन्यता, उत्कृष्ट सार्वजनिक सेवासुविधा इत्यादी विषयांच्या विविध आयोजनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. एवढेच नव्हे तर ‘डेव्हलपमेंटः एक्सपिरीएन्सेस, इनसाइटस् ऍण्ड इन्ट्रोस्पेक्शन’ हे पुस्तक देखील डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी २०२१ मध्ये लिहिले आहे. या पुस्तकाची चौथी आवृत्ती आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.