बांगलादेशच्या आर्थिक अधिकाऱ्यांनी इस्कॉनचे (ISKCON) माजी सदस्य चिन्मय कृष्णदास (Chinmoy Krishnadas) यांच्यासह धार्मिक संघटनेशी संबंधित 17 लोकांच्या बँक खात्यांमधील व्यवहार 30 दिवसांसाठी गोठवण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत ही माहिती देण्यात आली. दास यांना या आठवड्याच्या सुरुवातीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ‘प्रथम आलो’ वृत्तपत्राच्या बातमीनुसार, बांगलादेश फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट (BFIU) ने गुरुवारी विविध बँका आणि वित्तीय संस्थांना सूचना जारी केल्या आणि या खात्यांमधून सर्व प्रकारच्या व्यवहारांवर तात्पुरती बंदी घातली. (ISKCON)
बँकांकडून तीन दिवसांत मागवली माहिती
सेंट्रल बँक ऑफ बांगलादेश अंतर्गत येणाऱ्या BFIU ने बँका आणि वित्तीय संस्थांना या खात्यांशी संबंधित माहिती तीन दिवसांत पाठवण्यास सांगितले आहे. यामध्ये या 17 व्यक्तींच्या मालकीच्या सर्व प्रकारच्या व्यवसायांच्या सर्व खात्यांचे अद्ययावत व्यवहार तपशील आहेत. तसेच चितगावच्या न्यू मार्केट परिसरात हिंदू समुदायाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याचा आरोप करत दास यांच्यासह १९ जणांविरुद्ध चितगावमधील कोतवाली पोलिस ठाण्यात ३० ऑक्टोबर रोजी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘इस्कॉन’ ही कट्टरतावादी संघटना असल्याने त्यांच्यावर बंदी घालावी, ही बांगलादेश सरकारने (Bangladesh Govt) केलेली मागणी फेटाळतानाच उच्च न्यायालयाने पुरावे सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यापार्श्वभूमीवर ‘इस्कॉन ‘शी संबंधित लोकांची बँक खाती गोठविण्याची कारवाई केल्याचा दावा केला जात आहे. तसेच बांगलादेशात साधू आणि संतांसाठी अत्यंत धोकादायक वातावरण निर्माण झाले आहे.
चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक
बांगलादेशस्थित सनातनी जागरण ज्योतचे प्रवक्ते दास यांना सोमवारी ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना चितगाव न्यायालयाने जामीन नाकारला आणि तुरुंगात पाठवले, त्यामुळे त्याच्या समर्थकांनी निदर्शने केली.