Sexual Assault : बदलापूरची नायगावमध्ये पुनरावृत्ती; शाळेच्या कँटिंगमध्ये काम करणाऱ्याकडून ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

२२ ऑगस्ट रोजी मुलगी शाळेतील कँटिंगमध्ये जाण्यास तयार नव्हती. कँटिंगमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो, असे तिने शिक्षिकेला सांगितल्यानंतर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांना सांगितला.

262
बदलापूर येथील एका शाळेत झालेल्या ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) झाल्याची घटना घडली. त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटले. हे प्रकरण शमत नाही तोच नायगावमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली. नायगावच्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेत उपहागृहात काम करणार्‍या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने ७ वर्षांच्या चिमुकलीवर ४ ते ५ वेळा लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक

पीडित मुलगी ही या शाळेत दुसर्‍या इयत्तेत शिकते. २२ ऑगस्ट रोजी ती शाळेतील कँटिंगमध्ये जाण्यास तयार नव्हती. कँटिंगमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो, असे तिने शिक्षिकेला सांगितल्यानंतर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांना सांगितला. त्यांनी लगेच या मुलीची विचारपूस केली, तेव्हा मागील १५ दिवसांमध्ये शाळेच्या आवारात उपहारगृहामध्ये काम करणारा १६ वर्षीय तरुण या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करत असल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे एकदा मुलीने आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती, परंतु त्यांनी तेव्हा गांभिर्याने घेतले नव्हते. मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांनी त्वरीत याबाबतची माहिती नायगाव पोलिसांना दिली. या प्रकरणाची माहिती मिळातीच आम्ही आरोपी अल्पवयीन आरोपीला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे, अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली. या शाळेत तिवारी नामक व्यक्ती कँटिंग चालवतो. आरोपी असलेला बालक दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून येथे काम करण्यासाठी आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण (फुटेज) तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.