हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी विभागीय स्तरावर Task Force ची नेमणूक

मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा, बेकरी, उपहारगृहं, रस्त्यांवरील स्टॉल यासारख्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे इंधन वापरात येते, याची देखरेख टास्क फोर्स करणार आहे.

55

मुंबई महानगरासह मुंबईत अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावतो. ही बाब लक्षात घेता प्रदूषणासाठी धूळ हाही एक घटक वारंवार कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे हवेचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने धूळ नियंत्रण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांच्या स्तरावर कृती दल अर्थात Task Force नेमून प्रमाणित कार्यपद्धतीची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने कृती दलांच्या विभागीय स्तरावर नेमणूका करण्यात येत आहेत. प्रत्येक विभागामध्ये तीन विषयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन टास्क फोर्स राहणार आहेत.

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर सुधारावा म्हणून विभागीय पातळीवर प्रमाणित कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) अंमलात आणण्याची सुरूवात झाली आहे. धूळीच्या नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तातडीने व सक्त उपाययोजना अंमलात आणण्याचे तसेच या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बांधकाम रोखण्यासह इतर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठकीत दिले आहेत. हवा प्रदूषण व धूळ नियंत्रणाची प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती देखील गठीत करण्यात आली होती. समितीने सुचवलेल्या उपायांनुसार विभागीय स्तरावर कृती दल अर्थात Task Force नेमावयाचे आहेत. त्यानुसार, काही विभागांमध्ये टास्क फोर्सच्या नेमणुकांना सुरूवात होऊन त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष भेटींनाही सुरूवात झाली आहे. तर उर्वरीत विभागांमध्ये टास्क फोर्सची नेमणूक प्रक्रिया वेगाने सुरू असून लवकरच प्रत्यक्ष भेटींना सुरूवात होणार आहे.

(हेही वाचा Beach Shacks: कोकणाच्या चार जिल्ह्यांतील ८ समुद्रकिनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यास मान्यता)

इमारत बांधकामे आदींची तपासणी

इमारत बांधकामाच्या ठिकाणी हवेत उडणाऱ्या धुलिकणांच्या नियंत्रणासाठी ही Task Force काम करणार आहे. मुंबईत सुरू असलेल्या रस्ते आणि पूल बांधणीच्या कामाच्या ठिकाणी तीन सदस्यांची टास्क फोर्स ही प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून, प्रकल्प स्थळी नियमितपणे धूळ नियंत्रणाची खबरदारी घेण्यात आली आहे की नाही, याची पडताळणी करणार आहे. त्यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामांचाही यामध्ये समावेश असणार आहे. या टास्क फोर्समध्ये सहायक अभियंता (इमारत आणि कारखाने), सहायक अभियंता (इमारत प्रस्ताव), दुय्यम अभियंता (रस्ते विभाग) या सदस्यांचा समावेश असेल. नियमितपणे बांधकाम किंवा प्रकल्पाच्या ठिकाणी भेटी देवून तेथे धूळ नियंत्रणासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, उपाययोजनांमध्ये वापरात आलेले तंत्रज्ञान किंवा पद्धतीचाही टास्क फोर्सकडून आढावा घेण्यात येईल.

रस्त्यांची झाडलोट आणि स्वच्छता यावर लक्ष

मुंबईतील रस्त्यांची दैनंदिन झाडलोट व स्वच्छता करतानाही स्वाभाविकच धूळ उडते. सबब, या कामांमध्ये नेहमी धूळ आढळणारे रस्ते, नियमितपणे स्वच्छ करण्यात येणारे रस्ते, रस्त्यांवर धूळ नियंत्रणासाठीच्या उपाययोजना आणि पाण्याची फवारणी (स्प्रिंकलिंग) करणे, रस्ते स्वच्छतेच्या विशेष मोहीमा या बाबींवर टास्क फोर्स देखरेख ठेवणार आहे. उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा व इतर टाकाऊ वस्तू / पदार्थांची ठिकाणे, खुल्यावर जाळण्याची कारणे यांचाही टास्क फोर्सकडून शोध घेतला जाणार आहे. या टास्क फोर्समध्ये प्रामुख्याने सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन), दुय्यम अभियंता (परिरक्षण), उद्यानविद्या सहायक (हॉर्टिकल्चर असिस्टंट) यांचा समावेश आहे. रस्त्यांची किंवा पुलाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी नियमितपणे धूळ नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे की नाही, याची पडताळणी ही टास्क फोर्स करणार आहे.

अस्वच्छ इंधनाच्या वापराची पडताळणी

मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा, बेकरी, उपहारगृहं, रस्त्यांवरील स्टॉल यासारख्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे इंधन वापरात येते, याची देखरेख टास्क फोर्स करणार आहे. याठिकाणी अस्वच्छ इंधनाचा वापर होतो आहे का? याचीही पडताळणी टास्क फोर्स करेल. या टास्क फोर्समध्ये सहायक अभियंता (यांत्रिकी व विद्युत), वैद्यकीय अधिकारी (आरोग्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) यांचा समावेश असेल. अस्वच्छ इंधनाचा वापर करून धूळीमध्ये भर घालणाऱ्या ठिकाणी या टास्क फोर्सकडून प्रत्यक्ष भेटी देण्यात येतील.

टास्क फोर्स अशी करेल कारवाई

Task Forceच्या सदस्यांना विभागीय पातळीवर प्रत्यक्ष भेटीद्वारे निरीक्षणे नोंदवून अहवाल तयार करायचा आहे. हा अहवाल ते प्रत्येक आठवड्याला विभागीय सहायक आयुक्तांना सादर करतील. धूळ नियंत्रण, पर्यावरणाशी संबंधित बाबींची अंमलबजावणी न करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी समज देणारी नोटीस पहिल्यांदा बजावण्यात येईल. पहिल्या नोटीशीनंतरही नियमांची अंमलबजावणी न केल्यास त्या प्रकल्पांच्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यासोबतच कारवाईचा अहवालदेखील सहायक आयुक्त कार्यालयाला सादर करावयाचा आहे. ज्याठिकाणी उपाययोजनांचे उल्लंघन दिसेल अशा ठिकाणी कंत्राटदार किंवा जबाबदार संस्था यांच्यावर संबंधित विभागांमार्फत दंडात्मक कारवाई करुन घेण्याची कार्यवाही देखील टास्क फोर्सने पार पाडावयाची आहे.

स्वयं- प्रमाणिकरण आवश्यक

प्रकल्पाचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी कंत्राटदाराला हवा प्रदूषण होत नसल्याचे स्वयं- प्रमाणिकरण (सेल्फ सर्टीफिकेशन) घोषणापत्र द्यावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.