येणाऱ्या नवीन वर्षामध्ये म्हणजे २०२५ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या ‘लालपरी’ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. (MSRTC)
(हेही वाचा – आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात; बांगलादेशातील अंतरिम सरकारचा सल्लागार Asif Mahmud पुन्हा बरळला)
सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड कमतरता आहे. एसटीच्या ताफ्यामध्ये आता १४ हजार बसेस असून करोना महामारीपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये एसटीकडे तब्बल १८ हजार बसेस होत्या. परंतु गेल्या ३-४ वर्षात करोना महामारी व इतर काही कारणामुळे एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच बसेसची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त बसफेऱ्या देणे शक्य होईना. या सगळ्याचा विचार करून एसटीने स्वमालकीच्या २२०० बसेस खरेदी करण्याचा व १३०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सुमारे साडेतीन हजार बसेस जानेवारी महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात समाविष्ट व्हायला सुरू होतील. त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस नादुरुस्त होणे, बसेसची दोन-दोन तास वाट पाहत बसणे अशा तक्रारी कमी होतील. असे प्रतिपादन गोगावले यांनी यावेळी केली. (MSRTC)
(हेही वाचा – Nissan-Honda Merger : निस्सान, होंडा या कार उत्पादक कंपन्यांमध्ये विलिनीकरणाची बोलणी सुरू)
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यातील सर्व बस स्थानकाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना महामंडळाने आखली असून, काही बस स्थानके ही शासनाच्या निधीतून तर काही बस स्थानके बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्त्वावर खाजगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहेत. मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकाऱ्यांने राज्यभरातील १८३ बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली होती. त्याला आता गती प्राप्त झाली असून, नागपूर मधील गणेश पेठ बस स्थानकाचे काँक्रिटीकरण देखील याच टप्प्यात पूर्ण होत आहे. भविष्यात विदर्भातील एक देखणं बस स्थानक म्हणून गणेश पेठ बस स्थानकाचा नावलौकिक होईल असा गौरव गोगवले यांनी यावेळी केला. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. (MSRTC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community