मविआतून बाहेर पडण्याची धमक Uddhav Thackeray दाखवतील?

उद्धव ठाकरे यांच्या ‘मुख्यमंत्री जाहीर करा’ हा प्रस्ताव सपशेल नाकारण्याची हिंमत कॉँग्रेसने दाखवली.

188
  • सुजित महामुलकर

विधानसभा निवडणुकीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असल्याचा दावा दोन्ही, युती-आघाडीद्वारे केला जात असला तरी अद्याप प्राथमिक बोलणीच्या पुढे ही चर्चा गेलेली नाही, हे उघड आहे. महायुतीत जसे भाजपा-शिवसेनेला राष्ट्रवादीची (अजित पवार) अडचण झाली आहे तीच स्थिती महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाची झाली असल्याचे चित्र आहे. प्रश्न हा आहे की, अजित पवार यांची राष्ट्रवादी कमी जागा नाकारत बाहेर पडण्याची धमक दाखवू शकते, ते धाडस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवसेना उबाठा दाखवू शकेल का?

मराठी माध्यमांच्या इयत्ता तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत दोन गटातील ‘विषम’ घटक ओळखा? असा प्रश्न आला आणि दोन गट म्हणजेच भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी (अप) आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी (शप)-शिवसेना उबाठा असे पर्याय दिले तर त्या विद्यार्थ्यांनाही दोन गटातील एक विषम घटक निवडणे फारसे अवघड जाईल, असे वाटत नाही.

अजित पवार यांची ‘धर्मनिरपेक्ष’ ओळख कायम

महायुतीत भाजपा-शिवसेनेसोबत अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष योग्य साच्यात बसला आहे, हे मनाला न पटणारे आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या साच्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गट एकजीव झाल्याचे कुठेच दिसून येत नाही. यात या दोन्ही पक्षांची ‘राजकीय अपरिहार्यता’ दिसून येते. गेल्या काही दिवसात अजित पवार यांच्या पक्षाबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. भाजपा आणि शिवसेना (शिंदे) यांच्याकडून राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर पडण्यास प्रवृत्त केले जात असल्याची चर्चा आहे. जागावाटपात भाजपा १६०, शिवसेना ८० आणि अजित पवार यांच्या पक्षाला ४०-४२ जागा असे सूत्र ठरले तर मैत्रीपूर्ण लढत हा शेवटचा पर्याय अजित पवार निवडू शकतात. यासाठीच त्यांच्याकडून ‘हिंदुत्व’वादी गटात राहून आपली वेगळी ‘धर्मनिरपेक्ष’ ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न कटाक्षाने होताना वारंवार दिसून आला आहे. त्यामुळे उद्या अजित पवार युतीतून बाहेर पडले आणि भाजपा-शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून ‘सुंठीवाचून खोकला गेला’ अशा आशयाची प्रतिक्रिया आली तर आश्चर्य वाटू नये.

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना!

महाविकास आघाडीत मात्र ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी अवस्था कॉँग्रेस-राष्ट्रवादी (शप) आणि उबाठा यांची झाली आहे, असे दिसते. गेल्या काही दिवसांत राज्यातील कॉँग्रेस नेत्यांना अंगावर घेता-घेता उबाठाचा आत्मविश्वास इतका वाढला आहे की, आता थेट शरद पवार यांनाही आव्हान देण्याची तयारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केल्याचे दिसू लागले आहे. राज्यातील कॉँग्रेस नेत्यांचा पाणउतारा आणि टोमणे मारणे हे काही उबाठासाठी नवे नव्हते. कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांचे शीतयुद्ध जगजाहीर आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत कॉँग्रेसने ठाकरे यांच्याकडून होणारे अपमान गिळले, दादागिरी सहन केली. कारण ती राजकीय भवितव्यासाठीची ‘गरज’ होती. लोकसभा निवडणुकीत एका खासदारावरून १३ पर्यंत मजल मारल्यानंतर कॉंग्रेसची ताकद राज्यात वाढली, याची जाणीव पक्षाला झाली.

काँग्रेसचे ‘दादागिरी नही चलेगी’ धोरण

उद्धव ठाकरे यांच्या ‘मुख्यमंत्री जाहीर करा’ हा प्रस्ताव सपशेल नाकारण्याची हिंमत कॉँग्रेसने दाखवली. मुंबईतील विधानसभा जागावाटपात बोटचेपी भूमिका सोडून अधिकारवाणीचा वापर पक्ष करू लागला आणि गेल्या बुधवारी तर थेट दिल्ली हाय कमांडच्या दारात उबाठाचा विषय मांडत ‘दादागिरी नही चलेगी’ हा इशाराच उबाठाला दिला.

पवारांकडुनही उबाठाला अंतर

शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. प्रत्येक मतदारसंघाचा आणि उमेदवारीचा बारकाईने अभ्यास करून लोकसभेप्रमाणे ‘स्ट्राइक रेट’वर भर देत कमी जागा घेत कॉँग्रेसच्याही पुढे जाण्याच्या प्रयत्नात पवार असल्याचे सांगण्यात येते. एकीकडे उमेदवार निवड करत असताना कॉंग्रेस आणि उबाठातील ‘उंदीर-मांजरीचा खेळ’ त्यांच्या नजरेतून सुटणे अशक्य होते. आणि त्यांनीही कॉंग्रेसची ताकद ओळखून उबाठाला लांब करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्याचा प्रत्यय गेल्या आठवड्यात आला.

राऊतांनी पवारांना सुनावले

संजय राऊत यांनी श्रीगोंदा येथील विधानसभेचा उमेदवार परस्पर जाहीर केला. त्यावरून शरद पवार यांनी ‘उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही,’ असे सांगून उबाठावरील नाराजी बोलून दाखवली. तर राऊत यांनी त्यालाही उत्तर देत, ‘उबाठाची २८८ जागा लढण्याची तयारी’ असल्याचे सांगत आव्हान दिले. नुकत्याच नाशिक दौऱ्यावर असताना राऊत यांनी पुन्हा एक उमेदवार जाहीर करण्याचे धाडस केले. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार म्हणून उबाठाचे गणेश धात्रक यांचे नाव घोषित केले आणि त्यापुढे जात राऊतांनी पवारांवरही हल्लाबोल केला. शरद पवारांचे नाव न घेता ‘आता कुणीतरी आमचे नेते म्हणतील, तुम्ही परस्पर कसे काय उमेदवार जाहीर करता? पण मी काहीच जाहीर केलेले नाही. मी लोकांच्या मनातलं बोलतो आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे,’ असेही राऊत यांनी पवारांना सुनावले.
अजित पवार उद्या जरी महायुतीतून बाहेर पडले तरी स्वबळावर २५-३० आमदार निवडून आणू शकतात, असे उमेदवार त्यांच्याकडे आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत राहून स्वतःचे अस्तित्व धूसर केले आहे. पक्षाचा गाभा असलेला ‘हिंदुत्वा’चा मुद्दा ते हरवून बसले. लोकसभेत जरी मुस्लिम मतांचा तात्पुरता फायदा झाला असला तरी भविष्यकाळात त्यावर विसंबून राजकारणात टिकाव धरणे त्यांना घातक ठरू शकते. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून (शप) कितीही अपमानास्पद वागणूक मिळाली तरी स्वाभिमानाने बाहेर पडण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.