Wadala Assembly Constituency : कालिदास कोळंबकर नवव्यांदा विधानसभेत जाऊन विक्रम करणार?

148
Wadala Assembly Constituency : कालिदास कोळंबकर नवव्यांदा विधानसभेत जाऊन विक्रम करणार?

भाजपाचे वडाळा मतदारसंघाचे (Wadala Assembly Constituency) विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर नवव्यांदा विधानसभा निवडणूक लढविण्यास सज्ज झाले असून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ केल्याशिवाय निवडणूक रिंगणातून बाहेर पडणार नाही, असा निर्धार त्यांनी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विजयाची पताका

कोळंबकर यांनी सलग आठ वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. १९९० पासून २००४ पर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून कोळंबकर यांनी निवडणूक जिंकली. पहिल्याच निवडणुकीत कोळंबकर यांनी तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला आणि विजयाची पताका २०१९ पर्यंत फडकत ठेवली.

(हेही वाचा – Water Supply : पवईतील ‘त्या’ जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण, पाणीपुरवठा होणार सुरळीत)

पक्ष बदल, विजय कायम

पुढे २००५ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. कोळंबकर यांनीही त्यांना साथ देत पक्षत्याग केला आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राणे यांच्यासोबत कोळंबकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे गेले आणि बाजी मारली.

मोदी लाटेतही विजयी घोडदौड

त्यानंतर २००६, २००९ आणि २०१४ या तीन निवडणुका कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढल्या आणि मतदार संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले. विशेष म्हणजे, २०१४ मध्ये मोदी लाट असताना कोळंबकर यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यविरुद्ध, केवळ ८०० मतांनी, निसटता विजय मिळवला. (Wadala Assembly Constituency)

(हेही वाचा – Jammu Kashmir Terrorism: सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार)

बदलाची चर्चा

मागील विधानसभा निवडणुकीच्या (२०१९) काही महीने आधी जुलै २०१९ मध्ये कोळंबकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि पुन्हा आठव्यांदा निवडणूक जिंकली. गेल्या पाच वर्षात राजकीय चित्र १८० डिग्री बदलले आणि कोळंबकर यांच्या बदलाची चर्चा सुरू झाली. मात्र, भाजपाच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी केवळ विक्रम करण्यासाठी कोळंबकर यांची विनंती मान्य केल्याचे समजते.

गिनीज रेकॉर्र्ड्स देशमुख यांच्या नावे

राज्यातील सांगोलाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी ११ वेळा विधानसभेत जाण्याचा विक्रम याआधीच ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवला आहे. १९६२ ला देशमुख पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. मात्र १९७२ आणि १९९५ या दोन निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण असे दोन अपवाद वगळता देशमुख एकाच पक्षातून आणि एकाच मतदार संघातून ११ वेळा विधानसभेवर निवडून गेले. तर कोळंबकर हे सलग ८ वेळा विधानसभेवर निवडून गेले असून नवव्या वेळेची तयारी कोळंबकर यांच्याकडून सुरू आहे. (Wadala Assembly Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.