राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपापेक्षा कमी जागा लढवूनही बऱ्यापैकी यश मिळविणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार उभा करून भाजपावर कुरघोडी केली आहे. शिवसेनेच्या वतीने मुंबई पदवीधरमधून माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी (६ जून) अर्ज दाखल केला. त्यामुळे विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीत चुरस वाढली आहे. (Vidhan Parishad Election 2024)
विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ जून २०२४ अशी आहे. शिवसेनेचे उमेदवार दीपक सावंत हे काल, मंगळवारी (४ जून) उमेदवारी अर्ज भरणार होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकालामुळे सावंत यांनी बुधवारी कोकण भवन येथे जाऊन मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे सचिव संजय मोरे उपस्थित होते. (Vidhan Parishad Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Elections : ‘ईव्हीएम’चा मुद्दा गेला बासनात!)
लोकसभा निवडणूक एकत्र लढविणाऱ्या महायुतीने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपापले उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून २०२४ अशी आहे. या मुदतीत महायुतीत एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला नाही तर विधान परिषदेसाठी महायुतीत मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे. (Vidhan Parishad Election 2024)
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाने विधान परिषदेच्या कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरमधून किरण शेलार तर मुंबई शिक्षकमधून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांनी बुधवारी अनुक्रमे मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर नाशिक शिक्षकमधून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसने विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश श्रीधर कीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कीर हे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. (Vidhan Parishad Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community