Sanjay Raut भरकटले; मनसेमुळे उबाठाला फटका बसल्याचा अजब दावा!

164
Sanjay Raut भरकटले; मनसेमुळे उबाठाला फटका बसल्याचा अजब दावा!
Sanjay Raut भरकटले; मनसेमुळे उबाठाला फटका बसल्याचा अजब दावा!

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभेत जनतेने दिलेला कौलही आपण मानत नसल्याचे सांगितले. विधानसभा निवडणूक पराभवाने उबाठा प्रवक्ते इतके भरकटले आहेत की त्यांनी उबाठाच्या पराभवाला मनसेला जबाबदार धरले. मनसे आणि वंचितला भाजपाने उमेदवार उभे करण्यास सांगितले आणि त्यांच्या मतविभागणीमुळे उबाठाला फटका बसला, असा अजब दावा राऊत यांनी २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी केला. प्रत्यक्षात उबाठाचे २० मधील १० आमदार मनसेच्या उमेदवारांमुळे निवडून आले असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.

मनसे, वंचित यांना मॅनेज केल्याचा दावा

राऊत म्हणाले, “राज्यातील प्रत्येक मतदार संघात मनसे, वंचित यांचे मॅनेजमेंट करून आमचे उमेदवार कसे पाडण्यात आले, हे मुंबई आणि अन्यत्र ठिकठिकाणी पाहू शकता. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपाला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर, विशेषतः मोदी-शहा यांना, तरी सुद्धा राज्यात एक आशादायक चित्र दिसले असते. अनेक ठिकाणी भाजपाने त्यांना त्यांचे उमेदवार उभे करायला लावले. आणि त्याचा जो व्हायचा तो परिणाम अनेक वर्षे होतो आहे आणि तो झालेला आहे,” असे राऊत म्हणाले.

(हेही वाचा – Maharashtra Assembly 2024 Result: मुंबईत किती मतदारांनी नोटाला दिली पसंती? जाणून घ्या एका क्लिकवर )

वंचितवर टीका

वंचित बहुजन आघाडीवर टीका करताना राऊत म्हणाले, “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे मित्र बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी भाजपाला मदत होईल, अशी भूमिका घेतली. या सगळ्याचा आपल्याला भविष्यात विचार करावा लागेल.”

वास्तव चित्र

वास्तविक निवडणूक आयोगाची आकडेवारी पाहिली असता उबाठाच्या २० नवनिर्वाचित आमदारांना मिळालेले मताधिक्य यापेक्षा मनसे उमेदवाराना झालेले मतदान जास्त आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांमुळे महायुतीचे किमान जागांचे नुकसान झाले तर उबाठाची आमदार संख्या २० ऐवजी १० पर्यंत खाली आली असती, असे सांगण्यात येते. यामध्ये वणी, विक्रोळी, जोगेश्वरी (पूर्व), दिंडोशी, वर्सोवा, कलिना, वांद्रे (पूर्व), माहीम, वरळी आणि गुहागर या मतदार संघांचा समावेश आहे.

(हेही वाचा – सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग; NCP च्या आमदारांची बैठक; Ajit Pawar यांची ‘या’ पदी निवड)

वणीमध्ये उबाठाचे संजय देरकर यांचे मताधिक्य १५,५६० आहे तर मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांना २१,९७७ मतदान झाले आहे. विक्रोळीमध्ये उबाठाच्या सुनील राऊत यांना १५,५२६ इतके मताधिक्य आहे आणि मनसेचे उमेदवार विश्वजित ढोलम यांना १६,८१३ मतदान झाले. याचप्रमाणे जोगेश्वरी (पूर्व) मध्ये उबाठाचे अनंत (बाळा) नर यांचे मताधिक्य १,५४१ आहे आणि मनसेचे भालचंद्र अंबुरे यांचे मतदान १२,८०५, दिंडोशीत उबाठाचे सुनील प्रभू यांचे मताधिक्य ६,१८२ आहे तर मनसे उमेदवार भास्कर परब यांचे मतदान २०,३०९, वर्सोवात उबाठाचे हारून खान यांचे मताधिक्य १,६०० आहे तर मनसेचे संदेश देसाई यांना ५,०३७ इतके मतदान झाले आहे.

तसेच कलिनामध्ये उबाठाचे संजय पोतनीस ५,००८ मतांनी निवडून आले आणि मनसे बाळकृष्ण हुटगी यांना ६,०६२ मतदान आहे, वांद्रे (पूर्व) मध्ये उबाठाचे वरुण सरदेसाई यांना ११,३६५ मताधिक्य आहे तर मनसेच्या तृप्ती सावंत यांना १६,०७४ मतदान झाले, माहीममध्येही उबाठाचे महेश सावंत यांचे मताधिक्य १,३१६ आहे आणि मनसेचे अमित ठाकरे यांना ३३,०६२ इतके मतदान झाले, वरळीत उबाठा उमेदवार आदित्य ठाकरे यांचे मताधिक्य ८,८०१ आहे आणि मनसेचे संदीप देशपांडे यांना झालेले मतदान १९,३६७ इतके आहे आणि गुहागरमध्ये उबाठाचे भास्कर जाधव २,८३० मतांनी निवडून आले आणि मनसेचे प्रमोद गांधी यांना ६,७१२ मतदान झाले.

या आकडेवारीवरून मनसेमुळे उबाठाने नुकसान नाही झाले तर मनसेमुळे १० आमदार निवडून आले, असे म्हणावे लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.